गोंदिया : चारचाकीने जास्त असलेल्या इसमांना अडवून त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत मारहाण करणाऱ्या पाच जणांना डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत चिखली -कनेरी मार्गावर २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
फिर्यादी विशाल परसराम मेश्राम (रा. बाह्मणी-खडकी) हे बोलेरो गाडी क्रमांक एमएच ४० बीजी ९२३१ ने शेती कामातील बैल घेऊन २८ ऑगस्ट रोजी रात्री नवेगावबांधकडे जात असताना चिखली-कनेरी मार्गावर रात्री त्यांना आरोपी बबन रामरतन बडोले (३५, रा. कोहमारा), आकेस हिरामण बावनकुळे (२६, रा. पळसगाव), सौरभ यशवंत गोस्वामी (२१, रा. खजरी), सागर भीमराव कोटांगले (३३, रा. कोहमारा) व शैलेश देवाजी लाडे (३३, रा. कोहमारा) त्यांच्याकडील बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३५ एजी ८४३६ रस्त्यावर आडवे लावून अडविले. तसेच गाडीत ठेवलेले आठ हजार रुपये रोख हिसकावून घेत विशाल मेश्राम यांच्या सोबत असलेल्या इसमास लाथा-बुक्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी भादंवि कलम ३९५, ३४१, ३२३, ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास करीत ठाणे सचिन वांगडे यांनी पाचही आरोपींना २९ ऑगस्ट रोजी कोहमारा येथून अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.