चालकाला दिली समज : ट्रकमधील राख नागरिकांच्या डोळ्यातलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अदानी पॉवर प्लान्ट तिरोडा येथील राख सातोना येथील बलीराम कोटांगले यांच्या येथे टाकून राखेचा ट्रक भरधाव वेगाने चालवत असताना ट्रकमधील राहिलेली राख प्रवाशांच्या डोळ्यात जात होती. यावर त्या ट्रकला अडवून प्रवाशांनी चालक राहुल दुधराम बांते याला चांगलीच समज दिली. सदर ट्रक (एमए३५/के-३७४२) सातोना येथे अदानी पॉवरची राख खाली करुन भरधाव वेगाने तिरोड्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्यांच्या डोळ्यात धूळ व राखेचे कण जात होते. त्या ड्रायव्हरला रस्त्यात दुचाकी स्वारांनी रोकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना न जुमानता भरधाव वेगाने ड्रायव्हरने ट्रक चालविणे सुरूच ठेवले. शेवटी तिरोडा जवळील मोठ्या नाल्यापूर्वी त्या ट्रकला थांबविण्यात प्रवाश्यांना यश आले. यात धनलाल बिरबल रहांगडाले रा. शहीद मिश्रा वार्ड तिरोडा, जगदिश बिसेन रा. दांडेगाव यांनी आपली दुचाकी आडवी करुन ट्रकला अडविले. त्यानंतर ट्रक ड्रायव्हर व प्रवाशी यांच्यात बाचाबाची चालू असताना खूप लोक जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून तेवढ्यात पोहोचलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.गिरीपुंजे यांनी तहसीलदार संजय रामटेके यांना फोन लावला. यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मिटींगमध्ये आहे, नंतर बोलतो, असे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षण संदीप कोळी यांना फोनवर सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ट्रकचा नंबर वफोटो पाठवा मी बाहेर आहे. कारवाई करतो, असे सांगितल्यावर लोकांनी ड्रायव्हरला चांगलीच समज दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष गिरीपुंजे यांच्या मध्यस्थीने ट्रकला सोडून देण्यात आले. मोठा अनर्थ टळला. ट्रकच्या काचा फुटल्या असत्या किंवा ट्रक जाळल्यासुध्दा गेला असता, अशी दाट शक्यत होती. एकंदरीत अशा घटना होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
राख वाहतूक करणारा ट्रक प्रवाशांनी अडविला
By admin | Published: June 16, 2017 1:09 AM