साखरीटोला : दोन ते अडीच महिन्यांपासून आदिवासी सहकारी सोसायटीला धान विक्री करुनही अजुनपर्यंत धानाचे पैसे न मिळाल्याने सालेकसा तालुक्यातील कोटरा येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. यासंबंधी गेल्या २७ आॅगस्टला जिल्हाधिकारी गोंदिया यांना संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज सादर केला आहे. यात यादवकांत हत्तीमारे, दिलीप डोये, नरेश हत्तीमारे, मनोज हत्तीमारे यांचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यातील कोटरा येथील सदर शेतकऱ्यांनी आदिवासी विकास सेवा सहकारी संस्थेला दि. २० जून २०१५ ला धान विक्री केला. परंतु शासनाकडून धानाचे पैसे न आल्याने सदर शेतकऱ्यांना अजुनपर्यंत धानाचे पैसे मिळू शकले. काही शेतकऱ्यांनी आपल्यावर असलेले कर्ज भरले. कर्ज भरल्याची पावती मिळाली. परंतु नवीन कर्ज देता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत सापडले आहेत. धानाचे चेक न मिळाल्याने सावकाराकडे सोने गहाण ठेवून कर्ज काढावे लागले व त्या कर्जाच्या रकमेतून धानाची रोवणी करावी लागली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दि. २० आॅगस्टला विद्युत पंप जळाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी पैसे नाहीत, शेतीकरीता लागणाऱ्या रासायनिक खतासाठी, कीटकनाशकासाठी, मुलांच्या शिक्षणाकरीता पैसा नसल्याने सदर शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्रस्त होऊन त्यांनी इच्छामरण द्यावे, अशी मागणी केली आहे.
मागितली इच्छामरणाची परवानगी
By admin | Published: September 04, 2015 1:40 AM