देवरी : घरी भांडीधुणी करण्याचे काम करणाऱ्या मोलकरीण तरुणीने घरमालकिणीवर प्राणघातक हल्ला करून ५ लाख रुपये चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. १३) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये घडली. रघुवीर कौर गुरुमीत सिंग भाटिया असे मोलकरणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रजपालसिंग गुरुमितसिंग भाटिया यांची आई रघुवीर कौर गुरुमित सिंग भाटिया या घरी एकट्याच होत्या. नेमक्या याच संधीचा फायदा घेत घरी मोलकरीनचे काम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीने फिर्यादीच्या आईला डोक्यावर व कपाळावर काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घरी कपाटात ठेवलेले ५ लाख रुपये चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रजपालसिंग गुरुमितसिंग भाटिया यांनी याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटना स्थळी भेट देऊन या घटनेची चौकशी केली. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी अपराध क्र. २९/२०२१ कलम ३९७ अन्वये केली असून पुढील तपास देवरीचे ठाणेदार अजित कदम हे करीत आहेत.