वैद्यकीय अधिकारीच नाही : आरोग्य केंद्रात रिक्त पदे, रुग्णसेवा सलाईनवर आमगाव : तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्वीच रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा देण्यात मागे पडले आहे. यातच एकमात्र असलेले वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर गेल्याने सोमवारी १२ डिसेंबरला रुग्णांचे हाल झालेत. या वेळी रुग्णांनी रुग्णालयात हल्लाबोल केल्यानंतर डॉ. खोब्रागडे यांना पाचारण करण्यात आले. तालुक्यातील रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची मोलाची भूमिका आहे. तालुक्यातून रुग्ण उपचाराकरिता या रुग्णालयात गर्दी करतात. रुग्णांंना योग्य औषधोपचार देण्यासाठी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची एक वेगळी ओळख आहे. परंतु कालांतराने या रुग्णालयात नवीन वैद्यकीय अधिकारी आल्याने सामंजस्याअभावी रुग्णांना रेफरची चलन पुढे आली. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे वळावे लागत आहे. रुग्णालयात दररोज २०० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात येते. तसेच गरोदर मातांचे बाळंतपण याच रुग्णालयात सर्वाधिक होतात. रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे आहेत. यात डॉ. गगन गुप्ता पूर्णवेळ कार्यरत आहेत. तर याच रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी मागील काही दिवसांपासून कोणतीही सूचना न देता कर्तव्यावर आले नाहीत. तर तिसरे वैद्यकीय अधिकारी यांना तिगाव उपचार केंद्र येथे पाठविण्यात आले. त्यामुळे एकाच्या खांद्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच अधिपरिचारिका, लिपिक प्रत्येकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी सावळागोंधळ सुरू आहे. सदर रुग्णालयात पूर्वीच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये टोकाची लढाई सुरू आहे. यात एकमेव कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गगण गुप्ता सोमववार १२ सप्टेंबरपासून रजेवर गेले. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांना उपचाराकरिता ताटकळत बसावे लागले. रुग्णांना स्वत:च्या उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी नसल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा असंतोष उफाळून आला व त्यांनी रुग्णालयात हल्लाबोल केला. याची दखल घेत बनगावचे सरपंच सुषमा भुजाडे, उपसरपंच मनोज सोमवंशी यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णालयातील अवस्थेची जाण करून दिली. तेव्हा कुठे रुग्णालयात डॉ. खोब्रागडे यांना पाचारण करून रुग्णांना उपचार सुविधा देण्यात आले. तालुक्यातील रुग्णसेवेची धुरा या रुग्णालयावर असताना येथील रिक्त पदे व आरोग्य सेवेतील सावळा गोंधळ यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गप्प का? असा सवाल रुग्ण व नागरिक करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)रुग्णालयातील अनियमिततेसाठी चौकशी समिती बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीची चौकशी समिती लवकरच आपला अहवाल सादर करील. यात दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी माहिती देत रिक्त पदांबद्दल शासनाकडे प्रत्येक आठवड्यात माहिती पाठविण्यात येत आहे. रिक्त पदे भरण्याकरिता शासनाकडून पाऊल उचलण्यात यावे. रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावीत होत असल्याची कबुलीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.प्रसूत महिलेचे साहित्य गहाळ सदर रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल महिलेचे साहित्य असलेली पिशवी रुग्णालयातून चोरांनी लंपास केली. या पिशवीत प्रसूत महिलेने कपडे व काही खर्चायला असलेले पैसे जपून ठेवले होते. परंतु रुग्णालयाच्या अकार्यक्षमतेमुळे चोरांनी हात साफ केले. त्यामुळे रुग्णांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.
बनगावात रुग्णांचा हल्लाबोल
By admin | Published: September 14, 2016 12:24 AM