बाराभाटी (गोंदीया) : खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका तरुणावर तीन अस्वलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शैलेश भैय्यालाल रामटेके (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. तो जवळ्या बोळदे येथील राहिवासी असून या हल्ल्यात जखमी झाला आहे. आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
बोळदे गावातील चार महिला व दोन पुरुष हे वनविभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेव्हा तीन अस्वलांनी रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या खांद्याला अस्वलाच्या नखाचा वार आहे. हा घाव एवढा मोठा आहे, की त्यात अगदी हाताचे बोटही जाईल. तसेच जीव वाचविण्याच्या नादात पळताना मजुराची एका झाडाला धडक बसली. यामुळे त्याच्या पायालाही इजा झाली आहे. संबंधित रुग्णाला ग्रामीण रुग्णालय अर्जुनीमोरगाव याथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मजूर हे सुशिक्षित बेरोजगार आहेत, हाताला काम नाही, संपूर्ण परिवार हा संकलन करणाऱ्या मजूरावर अवलंबून आहे. कमाई करणारे केवळ मजूरच असल्याने शासनाच्या वनविभागाने पाच लाखाची शासकिय मदत करावी. अशी मागणी परिवाराने केली आहे. यासंदर्भात बोलताना जखमी शैलेश यांचे वडील भैय्यालाल राघो रामटेके, म्हणाले, माझा मुलगा हा परिवार चालविण्यासाठी तेंदुपत्ता संकलन करायला गेला, तर अस्वलाने हल्ला केला. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी.
तर शैलेश म्हणाले, मी बेरोजगार तरुण असून कुठलेही काम करतो. मी या हल्ल्यात कसाबसा वाचलो. शासनाने पच लाख रुपयांची मदत करावी.
मी स्वतः डिसीएफ कुलराज सिंग यांना फोन केला. त्यांनी फोन स्वीकारला नाही. वनविभाग हे वाऱ्यावरच असल्यासारखे आहे. गंभीर जखमी मजूराला शासनाची मदत तातडीने मिळेल, असा प्रयत्न सुरू आहे. - मनोहर चंद्रिकापुरे, आमदार अर्जुनीमोरगाव विधानसभा.