दोघांना अटक : विविध अवयव जप्त, वनविभागाची कारवाई गोंदिया : वाघाच्या कातडी प्रकरणाची शाई वाळत नाही तोच आता अस्वलाची शिकार करून त्याचे अवयव विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला. गोरेगाव वनपरिक्षेत्रात तिल्ली मोहगाव बिटमध्ये घडलेल्या या शिकारीतील दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिल्ली-मोहगाव व गौरीटोला या गावांदरम्यान असलेल्या तलावाजवळ सदर अस्वलाची शिकार विद्युत तारांद्वारे करंट लावून करण्यात आली. याबाबतची तक्रार वनविभागाकडे शुक्रवारच्या (दि.१०) रात्री करण्यात आली होती. गोरेगाव वनपरिक्षेत्राधिकारी जाधव, गोंदिया वनसंरक्षक पथक-१ चे सहायक उपवनसंरक्षक एस.एस. सोरथिया व दोन गार्डसह घटनास्थळी रवाना झाले. तपासात विद्युत तार पसरविण्यात आल्याचे आढळले. त्यांनी मृत अस्वल ताब्यात घेवून शनिवारी (दि.११) उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. वनसंरक्षक पथकाने सदर शिकार प्रकरणाचा तळ गाठण्यासाठी घटनास्थळाची सखोल तपासणी केली. यात त्यांना तलावाच्या उजव्या बाजूला इलेक्ट्रीक वायर आढळून आले. त्यामुळे अस्वलाची शिकार विद्युत करंट लावून करण्यात आल्याचा संशय बळावला. यानंतर बाजूच्या परिसरातच दोन झोपड्या आढळल्या. त्यातील एका झोपडीच्या छतावर असलेल्या तणसात एक बरणी आढळली. त्या बरणीत केस व आतील अवयव आढळले. तेथील कापडही रक्ताने माखलेले होते. झोपडीच्या आड्यावर एक लहान पॉलिथिन पथकाला आढळले. त्या पॉलिथिनमध्ये दात आढळले. झोपडीतील दोन कुऱ्हाड व विळेही जप्त करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर दात अस्वलाचेच असल्याचे आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून सांगितले. मात्र बरणीतील आतील अवयव हे अस्वलाचेच की अन्य कोण्या प्राण्याचे हे फोरेन्सिक लॅबमधून अहवाल आल्यानंतरच ठामपणे सांगता येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.१४) संपूर्ण दिवसभर चौकशी करून शोध व तपासकार्य केले. यात त्यांनी सायंकाळी ६ ते ७ वाजतादरम्यान दोन आरोपींना अटक केली. त्यांची नावे सुखदेव भेंडारकर व यादवराव रहांगडाले दोन्ही रा. तिल्ली-मोहगाव अशी आहेत. यापैकी सुखदेव भांडारकर हा सऱ्हाईत गुन्हेगार असून त्याच्यावर सन २०१२ मध्ये शिकारीचे गुन्हे नोंद आहेत. यादवराव रहांगडाले याने त्याला सहकार्य केले. यादवरावने आपल्या बयाणात सुखदेवला आपण शिकार करताना प्रत्यक्ष बघितल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना बुधवारी (दि.१५) न्यायालयात हजर करण्यात आले आहे.(प्रतिनिधी) मृत अस्वलाचे अनेक अवयव गायब अस्वलाची शिकार केल्यानंतर पंजे, लिंग, यकृत आदी अनेक अवयव आरोपींनी काढून घेतल्याचे वन विभागाच्या पथकाला आढळले. तपास कार्यादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या झोपडीत असलेल्या बरणीत व वर बांधलेल्या पॉलिथिनमध्ये नेमके असेच अवयव आढळले आहेत. मात्र अस्वलाचे गायब असलेले अवयव नेमके हेच आहेत किंवा नाही, यासाठी त्या अवयवांना फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवालानंतरच अस्वलाच्या अवयवांचे सत्य उघड होईल.
अस्वलाची शिकार करून अवयव विकण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 16, 2017 12:37 AM