गोंदिया : जिल्ह्यात पुढील दोन महिन्यांत नगर पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हाेऊ घातल्या आहेत. याचदरम्यान मतदार याद्या तयार करून त्या जाहीर केल्या जात आहेत. मात्र, सडक अर्जुनी शहरातील मतदार याद्यांमध्ये दीडशेवर बाहेरगावातील मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. हे हेतूपुरस्सर करण्यात आले असून, निवडणुका समोर असल्याचे पाहून हे केले जात असल्याचा आरोप नगर पंचायतचे माजी सभापती दिनेश अग्रवाल यांनी शुक्रवारी (दि.१२) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला अभय राऊत, बाबादास येरोला, रेहान शेख, जागेश्वर पटोले उपस्थित होते. दिनेश अग्रवाल म्हणाले, पुढील महिनाभरात नगर पंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. याच अनुषंगाने काही जणांनी बोगस मतदारांची नावे नोंदविली आहेत. सडक अर्जुनी येथील मतदार यादीत वडेगाव, परसोडी, मासूलकसा, नागपूर, खजरी, आदर्श कोहळीटोला, राका आदी गावांतील रहिवाशांची नावे नोंदविण्यात आली आहेत. मतदार यादीत ही नोंद करताना प्रत्यक्षात आधारकार्ड आणि रहिवासी दाखल्याची पडताळणी करण्यात आली नाही. मतदार याद्या तयार करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मतदार यादीत पडताळणी न करता बोगस नावे नोंद करणाऱ्यांवरसुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल यांनी केली. यासंदर्भात मतदार यादीवर आक्षेप घेत जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. मतदार यादीतील बोगस नावांची पडताळणी करून बोगस नावे त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
......
वास्तव्य एका ठिकाणी, मतदान दुसऱ्या ठिकाणी
मतदार याद्यांमध्ये नोंदणी करताना योग्य पडताळणी केली जात नसून कुणाच्या सांगण्यावरून मतदार यादीत नावे नोंदविली जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता आहे. वास्तव्य दुसऱ्या गावात आणि मतदार यादीतील नाव तिसऱ्याच गावात असे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील गैरप्रकार टाळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.