गोंदिया : हलकीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रथम परिचराची नोकरी मिळवली. त्यावरही न थांबता जिद्द व चिकाटीने अभ्यास करून वर्ग दोनचे अधिकारी पद त्या परिचराने मिळविले. प्रकाश ताराचंद मेंढे असे त्यांचे नाव आहे.गोंदिया तालुक्याच्या खमारी येथे राहणाऱ्या प्रकाशने हलाकीच्या परिस्थितीवर मात करीत बी.एस.सी बी.एड. शिक्षण २००५ मध्ये झाले. २००६ मध्ये शिक्षण सेवक म्हणून काम केले. हिरडामाली येथे १ हजार रूपये मानधनावर काम केले. याच काळात वडीलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर प्रकाशने २००८ मध्ये शासकीय आयुवैदीक महाविद्यालय, नागपूर येथे शिपाई पदावर नोकरी केली. शहरात ही नोकरी परवडत नसल्याने त्यांनी जलसंपदा विभाग गोंदिया येथे शिपाई म्हणून नोकरी पत्करली. त्यावरही ते न थांबता त्यांनी सहाय्यक भांडारपाल पदाची परीक्षा उत्तीर्ण केली व लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथे रूजू झाले. २०१० मध्ये तलाठी म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, सांखीकी पदाची परीक्षा उतीर्ण केली. पंचायत समिती लाखांदूर येथे पाच वर्ष काम केल्यावरही त्यांनी अभ्यासाचा ध्यास सोडला नाही. त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतीर्ण केल्याने महिला व बाल विकास अधिकारी वर्ग २ या पदाकरीता निवडण्यात आले. जीद्द चिकाटीने सातत्य राखत ज्ञानार्जन करून पुढे जाण्याचे ध्येय ठेवणाऱ्या प्रकाशने अख्खे कुटुंब प्रकाशमान केले.शिकवणी वर्गात न जाता नोकरी झाल्यावर घरीच बसून अभ्यास करणाऱ्या प्रकाशने जिद्द आणि चिकाटीतून कसे प्रकाशमान होता येते याचे स्वत:चे उदाहरण समाजापुढे ठेवले. (तालुका प्रतिनिधी)
परिचर झाला वर्ग दोनचा अधिकारी
By admin | Published: October 06, 2016 12:54 AM