आमगाव (गोंदिया) : नोकरी तर मिळाली, परंतु सहा महिन्यांपासून एक रुपयाचेही वेतन दिले नाही. घरापासून शंभर किलोमीटर दूर राहून उपाशीपोटी नोकरी करायची का, असा सवाल करीत आपल्याला वेतन मिळावे म्हणून आमगाव तहसील कार्यालयातील शिपायाने सोमवारी (दि. २७) दुपारी ३ वाजता झाडावर चढून वीरूगिरी केली.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या राकेश बोरकर याची सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये पदोन्नती झाली. त्याला आमगाव तहसील कार्यालयात नियुक्ती देण्यात आली. परंतु काम करीत असताना त्याला ऑगस्ट २०२२ पासून त्याला एकही रुपया मिळालेला नाही. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला वेतन मिळाले नाही, असे गृहीत धरून त्याने २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातील पिंपळाच्या झाडावर चढला. तो झाडावर चढलेला पाहून लोकांची आरडाओरड झाली. परिणामी त्याला पाहण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली. तुझी मागणी मान्य होईल, असे सांगताच तो खाली उतरला.
१० मिनिटे विरूगिरी
वेतन देण्याच्या मागणीला घेऊन झाडावर चढलेल्या राकेश बोरकर हा अवघ्या दहा मिनिटातच झाडावरून उतरला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याला आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्याची वैद्यकीय चाचणी
तहसील कार्यालयातील पिंपळाच्या झाडावर चढून वीरूगिरी करणाऱ्या शिपायाने मद्यप्राशन करून हे कृत्य केल्याचे लक्षात आल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आमगाव पोलिस घेऊन गेल्याचे तहसीलदार मानसी पाटील यांनी सांगितले.
राकेश बोरकर यांनी तहसील कार्यालयात सादर केलेले कागदपत्र बरोबर नव्हते, पॅनकार्ड चुकीचा होता. त्यामुळे ते कागदपत्र बरोबर करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर आता त्याची कागदपत्रे पुण्याला गेली आहेत. त्याचे सर्व्हिस बुक तयार करण्यासाठी आणि पॅन नंबर येण्याची आम्हाला प्रतीक्षा होती. आम्हाला पॅन नंबर आल्याशिवाय वेतन देण्याची प्रक्रिया करता येत नाही. आमच्या स्तरावर त्याचे काम पेंडिंग नाही ते पुणे येथे आहे.
- मानसी पाटील, तहसीलदार आमगाव.