आगाराच्या उत्पन्नावर डल्ला : पाठपुरावा करूनही समस्या ‘जैसे थेगोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मानगुटीवर आॅटो व काळीपिवळीवाले येवून बसले आहेत. नियमांना तोडून आॅटो व काळीपिवळईवाले एसटी बस स्थानकाच्या थेट प्रवेशद्वारासमोर उभे राहून एसटीच्या प्रवाशांना पळवून नेत आहेत. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी न करण्याचा नियम आहे. मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे या नियमांचा भंग करून सरसकट बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर आपली वाहने उभी करतात व एसटीच्या प्रवाशांना उचलून नेतात. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत असून उत्पन्नात घट होत आहे. तसेच काळी-पिवळी व इतर खासगी प्रवासी वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रवासी भरून त्यांना कोंबून नेले जाते. त्यामुळे दुसऱ्या नियमांचासुद्धा भंग त्यांच्याकडून होत आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीला संबंधित आरटीओ व पोलिसांचे पाठबळ असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कारवाई केली जात नसावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.विशेष म्हणजे बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहने लावण्यात येवू नये, याबाबत आरटीओ व एसपी कार्यालयाला दर महिन्यात पत्र दिले जाते. शिवाय आगाराकडून नियमित पाठपुरावा केला जातो. मात्र समस्या ‘जैसे थे’च राहते. अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने लक्ष दिले तर एसटीच्या उत्पन्नात आणखी भर पडू शकेल. (प्रतिनिधी)स्कूल बसेस लागणार प्रवासी सेवेतशासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत निळ्या स्कूल बसेस एसटीला उपलब्ध करून दिल्या. गोंदिया आगारात एकूण ९८ बसेस असून यापैकी २८ स्कूल बसेस आहेत. सुट्टीच्या दिवसांत या स्कूल बसेस केवळ जिल्ह्यातच प्रवासी सेवेत लावण्याचे नियम आहेत. येणाऱ्या काही दिवसांत दिवाळीची शाळांना सुट्टी असल्यामुळे सदर स्कूल बसेस प्रावाशांसाठी धावणार आहेत. सर्व ९८ बसेसचे शेड्युल (नियते) ९१ असून दिवसभरात एकूण ४५० फेऱ्या अपेक्षित असतात.वाहकांची रिक्त पदे सुद्धा कारणीभूतगोंदिया आगारात चालकांची १५६ व वाहकांची १५६ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्ष १४५ चालक व १२६ वाहक कार्यरत आहेत. वाहकांची कमी किंवा त्यांच्या रिक्त पदांमुळे अनेकदा फेऱ्या रद्द कराव्या लागतात किंवा वाहक तयार असतील तर त्यांच्याकडून ओव्हरटाईम काम करवून घेतले जाते. मागील अनेक महिन्यांपासून वाहकांसह इतरही पदे रिक्त असून राज्य परिवहन महामंडळाने रिक्त पदांची पूर्तता न केल्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम पडत आहे. यांत्रिकांची ५३ पदे मंजूर असून ३५ कार्यरत तर तब्बल १८ यांत्रिकांची पदे रिक्त आहेत.
आॅटो-काळीपिवळी एसटीच्या मानगुटीवर
By admin | Published: October 17, 2016 12:32 AM