गोंदिया : शहरातील अवंतीबाई चौकात असलेल्या ऑटोमोबाइल्स दुकानाला आग लागून दुकानातील संपूर्ण सामान जळून भस्मसात झाले. रविवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता दरम्यान ही घडलेल्या या घटनेत दुकान मालकांचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुरेंद्र मनराज रहांगडाले यांचे अवंती चौकात वैनगंगा ऑटोमोबाइल्स नावाचे दुकान असून, दुकानावरच त्यांचे घर आहे. शनिवारी (दि. २९) दुकान बंद करून ते आपल्या सासूरवाडीत गेले होते. रविवार (दि. ३०) असल्याने दुकान बंद होते; मात्र दुकानातून धूर निघत असल्याचे बघून त्यांचे शेजारी पारस चौधरी यांनी त्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानुसार, रहांगडाले यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली व दुकान गाठले. माहितीवरून लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील संपूर्ण सामान जळून राख झाले होते. या आगीमुळे रहांगडाले यांचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या कारवाईत अग्निशमन विभागातील ठाकरे, बिसेन, जैतवार, नीलेश चव्हाण, शुभम दास, तेजलाल पटले आदींनी भाग घेऊन आग नियंत्रणात आणली. अन्यथा आगीमुळे आणखीही नुकसान होण्याची शक्यता होती.शॉर्टसर्किटने लागली आग- अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत दुकानातील सामान पूर्णपणे जळून राख झाले होते. रहांगडाले दुकान बंद करून केल्यानंतर त्यात आग लागली, यावरून दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.