गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बिहिरिया येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक कनिष्ट अधिकारी हे चौकशीत दोषी आढळले होते. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई करून पदावरून दूर करण्यात आले नाही. जि.प. मुख्यकारी अधिकारी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मोतीराम ठाकरे यांनी केला आहे. त्वरित कारवाई न केल्यास जि.प. समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बिहिररिया येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामात सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता यांनी संगनमत करून आर्थिक घोळ केला. याची लेखी तक्रार पुराव्यासह मोतीराम ठाकरे, गजानन जमईवार, पतीराम ठाकरे यांनी १५ एप्रिल २०१९ रोजी जिल्हा तक्रार निवारण समितीकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली. त्यानंतर समितीने ग्रामसेवकाकडून रेकाॅर्ड मागवून तपासणी केली असता त्यात ग्रामसेवक दोषी आढळले होते. तसेच या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी केली असता त्यात बोगस मजुरांची नावे नोंदवून मजुरी काढण्यात आली. तलाव खोलीकरणातील मातीचीसुद्धा विक्री केल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणात एकूण २५ जणांचे बयान नोंदविण्यात आले. मात्र यानंतरही दोषींवर कुठलीच कारवाई न करण्यात आल्याने ठाकरे यांनी लोकआयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. याचीच दखल घेत लोकाआयुक्तांनी गोंदिया जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र देऊन यासंदर्भात काय कारवाई केली, याचा अहवाल मागविला आहे. मात्र अद्यापही हा अहवाल सादर करण्यात आला नाही. अहवाल सादर करण्यास २३ एप्रिल २०२१ पर्यंत अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात यापूर्वीच विभागीय आयुक्तांनी चौकशी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. पण जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्याचा आहे.
............
अधिकारी देत आहेत घोळ करणाऱ्याला अभय
मनरेगाच्या कामात आर्थिक घोळ केल्याचे चाैकशीत सिद्ध झाले आहे. तसेच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. मात्र याला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी घोळ करणाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप मोतीराम ठाकरे यांनी केला आहे.
...........