लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्डे, मोकळे भूखंड तसेच सखल भागात पाणी साचत असते. अशा दूषित पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात पुरेशी स्वच्छता पाळावी, पाणी साचू देऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दूषित पाणी व मातीशी नागरिकांनी संपर्क टाळावा. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावे, वैयक्तिक स्वच्छता टिकवून पावसाळ्यात घरासभोवताल जीवजंतूची निर्मिती होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
लेप्टोस्पायरोसिस हा संसर्गजन्य आजारलेप्टोस्पायरोसिस हा आजार जनावरांत आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूच्या २३ प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि शेवटी याचे रुग्ण आढळतात.
आजाराची प्रमुख कारणे काय ?■ लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूमुळे होतो. व्यक्तीच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून किंवा त्वचेच्या फोडातून शरीरात प्रवेश करतात. दूषित पाण्यात पोहणे, अस्वच्छ भागात राहणे ही कारणे आहेत.
काय काळजी घ्याल?■ पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जाऊ नये, दूषित पाणी, माती किवा भाज्यांचे मानवी संपर्क टाळावे, यासाठी हातमोजे वापरता येईल. मूत्रामुळे पाण्याचे साठे दूषित होऊ देऊ नये, पावसात भिजल्यास हातपाय स्वच्छ धुवावे.
लक्षणे काय?■ ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, पोटदुखी, उलट्या, मळमळ, व्रण, डोळे लाल होणे, त्वचा पिवळी होणे आदी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात.■ रोगाच्या तीन ते दहा दिवसांनी काही गंभीर लक्षणे आढळून येतात. यामध्ये खोकलल्याने रक्त येणे, छातीत दुखणे, लघवी कमी होणे आदी.
जखम असल्यास अधिक खबरदारी आवश्यक■ या रोगाची लक्षणे आढळून येताच तसेच जखम असल्यास पूर्ण खबरदारी घेणे गरजेचे ठरते. अन्यथा या रोगाचे प्रमाण शरीरात आणखी वाढून मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.
साचलेल्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला लेष्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून संशयित रुग्ण आढळल्यास याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी.- डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी