जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन : जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पारगोंदिया : उष्माघातापासून बचावासाठी उन्हात काम करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात भरती करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्माघाताची शक्यता बळावली आहे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरानहाईट किंवा ४१ अंश सेल्सिअस यापेक्षा जास्त वाढल्यास उष्माघात होण्याचा धोका राहते. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे. याला वैद्यकीय आणीबाणी मानले जाते. उष्माघात हा मेंदू व शरीरातील अंतर्गत अवयवास हानी पोहोचवू शकतो. उष्माघात हा ५० वर्ष वयोगटातील लोकांना तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होण्याची शक्यता राहते. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) राहते. मानवी शरीराच्या तापमानाला समतोल राखण्याची क्रिया सुरू राहते. १०६ अंश फॅरनहीट जास्त झाल्यास बेशुद्धावस्था येते. क्वचितप्रसंगी रूग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. उष्माघातापासून बचावासाठी शक्यतो उन्हात फिरणे किंवा अंग मेहनतीचे काम करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे. उन्हाळ्यातच शेतीपूर्व मशागतीला सुरूवात होते. शेतकरी दिवसभर उन्हामध्ये शेतीची कामे करतात. त्यामुळे ग्रामीण भागात उष्माघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळते. शेतकऱ्यांनी सकाळीच कामे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
उन्हात काम करणे टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2016 2:16 AM