गोंदिया : आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण व जनजागृती आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करुन पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (एसडीआरएफ) पोलीस उप अधीक्षक (नागपूर) सुरेश कराळे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारी- २०२१ च्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.४) आयोजित पूर परिस्थतीत शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी एसडीआरएफ नागपूरचे पोलीस उप निरीक्षक अजय काळसर्पे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. कराळे यांनी, मागील वर्षी २०२० मधील पूर परस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील नियोजन करणे अपेक्षित आहे. आपत्ती काळात परिस्थितींना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने दक्षता घेऊन कामाचे नियोजन करावे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या रंगीत तालिम व प्रशिक्षणाचा वापर जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने मान्सून काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हयातील जलाशय, धरण व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असल्यामुळे येणाऱ्या काळात पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नदीकाठावरील गावातील नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती कमी असल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. याकरिता विद्यार्थी प्रवर्गाला प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. पूर परिस्थितीत जीवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. तसेच पुराचे प्रकार, पूर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पूर्वसूचना, हवामान खात्याचा अंदाज इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात माहिती देऊन आपले अनुभव
सांगितले. प्रशिक्षणाला दीपक परिहार, यादव फरकुंडे, इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिऱ्हेपुंजे, गिरधारीलाल पतैहे, जबराम चिखलोंडे, जितेन्द्र गौर, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराळे, दिनू दीप, राजकुमार खोटेले, सुरेश पटले, राजेंद्र अंबादे, शर्मानंद शहारे, गजेंद्र पटले, मुकेश ठाकरे, समित बिसेन, राजेंद्र शेंडे, अंश चौरसिया, विशाल फुंडे, राहुल मेश्राम, शहबाज सय्यद, सुमित बिसेन, आदित्य भाजीपाले, अरविंद बिलोन, अजय राहांगडाले, विकास बिजेवार, अंबादे, बांते कावडे, गायधने तसेच एसडीआरएफ व एसआरपीएफचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.