बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरबोडी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच गौतमाबाई मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली गावात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. गावकऱ्यांना मनात कुठलीही शंका न बाळगता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृती दल व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घेऊन कोरोनाविरुध्दच्या लढाईत साथ द्यावी, असे समाजसेवक संजय रहांगडाले यांनी सांगितले. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे यावर मार्गदर्शन करण्यात आले. यासंदर्भात जनजागृती करणारे पोस्टर गावात लावण्यात आले. जनजागृती मोहिमेत लय, ताल, कृतीच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रत्येक घरी गृहभेटी घेऊन लसीकरणाचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे माजी सभापती वाय. टी. कटरे, पोलीसपाटील युवराज टेंभरे, उपसरपंच पटले कमल ठाकरे, ग्रा.पं. सदस्य शीला बिसेन, अजय सदरे, प्रशांत गौतम, विलास डोंगरे, सुजित पवार, संजय मडावी व अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होत्या.