विजय सूर्यवंशी : समाज कल्याण विभागाची अधिकारी-कर्मचारी कार्यशाळा गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाची शिखरे गाठली. जगातील एक आदर्श संविधान त्यांनी देशासाठी लिहिले. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक क्षेत्रातील असलेले त्यांचे ज्ञान, कौशल्य व परिश्रम करण्याची तयारी असा एकूण त्यांचा जीवनपटच हा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. गुरूवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उदघाटकप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सविता बेदरकर, शुद्धोधन शहारे तर मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.रामगावकर यांनी, समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी डॉ.आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन व समाजाच्या कल्याणासाठी काम करु न त्यांनी आदर्श निर्माण केला. डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. प्रत्येकापर्यंत आज शिक्षण पोहचले आहे ते केवळ बाबासाहेबांमुळेच असे मत व्यक्त केले. बेदरकर यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बालवयापासून जातीयतेचे चटके सहन केले. बुद्धीवंतांच्या घरी बुद्धीवंत जन्माला येतो परंतू अस्पृश्याच्या घरी सुद्धा विद्वान जन्माला येतो हे डॉ. आंबेडकरांनी सिद्ध करु न दाखिवले. त्यांनी पत्नी व मुलाकडे दुर्लक्ष केले परंतू समाजाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी खुप मोठा त्याग केला. महिलांना संपत्तीचा अधिकार मिळवून दिला. नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसुती रजा बाबासाहेबांमुळेच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शहारे म्हणाले, भारतीय संविधान आजही देशातील लोकांना कळले नाही. त्यामुळे समाजात संघर्ष होत असतो. संविधानाची आजही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करुन त्यांनी, समाजातील कमजोर वर्गावर आजही अन्याय-अत्याचार होत आहे. शाहू महाराजांनी कमजोर वर्गाच्या कल्याणासाठी खुप कष्ट घेतले. संविधानातील प्रत्येक कलमांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकातून सहायक आयुक्त वानखेडे यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह योजना, निवासी शाळा, आर्थिक, शैक्षणिक लाभाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी समतादूत किशोर मलेवार व सतीश शामकुवर यांनी कवितेचे वाचन केले. संचालन रवी बरके यांनी केले. आभार मिलिंद रामेटके यांनी मानले. कार्यशाळेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बाबासाहेबांचा जीवनपट प्रेरणादायी
By admin | Published: April 16, 2016 1:15 AM