सडक-अर्जुनी : दि लॉर्ड बुद्धा फाउंडेशन, खरे बौद्ध बना जागृती अभियान अंतर्गत भारतीय जनगणना २०२१ चे औचित्य साधून संबोधी बौद्ध विहार सडक-अर्जुनी येथे खरे बौद्ध बना हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी आपला हिंदू धर्म सोडून खरे बौद्ध धम्मात संजय बघेले आणि लोकेश कावळे यांनी प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचो, प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि लॉर्ड बुद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम गेडाम, डव्वा येथील भंते संघधातू उपस्थित होते. भंते संघधातू यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा उपस्थितांना आणि धर्मांतरित कुटुंबांना दिल्या. माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांच्या हस्ते संजय बघेले व लोकेश कावळे यांना धम्मविधीचे पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन सम्मानित करण्यात आले. जनगणनेच्या माध्यमाने जात नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. ती वाया जाऊ देऊ नये. अल्पसंख्याक आयोगाने १९९२ ला बौद्धांचा समावेश अल्पसंख्याकांत केला आहे. अल्पसंख्याकांसाठी शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत आणि आवासापासून ते उद्योगापर्यंत कर्ज देण्यासाठी योजना आखल्या आहेत, त्यांचा लाभ बौद्धांना मिळेल. त्यासाठी जनगणनेच्या फार्ममध्ये जात बौद्ध व धर्म बौद्ध आणि श्रेणी अल्पसंख्याक तसेच मातृभाषा मराठी व धम्म भाषा पाली अशी नोंद करावी लागेल, अशी माहिती दि लॉर्ड बुद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुळसीराम गेडाम यांनी दिली. यावेळी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म का घेण्यात आला याविषयी बघेले आणि कावळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बौद्ध धम्म हा वैज्ञानिक आधारावर चालणारा असून, आपल्याला प्रगती करायची असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. कार्यक्रमाला शेकडो बौद्ध उपासक-उपासिका व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रंजिता मेश्राम यांनी केले.