गोंदिया : बहुजन क्रांती मोर्चा आयोजन समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी (दि.१२) बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकूण ४७ मागण्यांसाठी सुर्याटोला मैदानातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर एससी, एसटी प्रमाणेच ओबीसी, भटके, विमुक्त प्रवर्ग, धर्मांतरीत अल्पसंख्याक व बलुतेदार यांची जातीनिहाय जनगणना त्वरीत करावी, ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी असलेली क्रिमीलीयरची असंवैधानिक अट रद्द करण्यात यावी, रेणके आयोग, मंडळ कमिशन, स्वामिनाथन आयोग व नच्चीपन कमिशनच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, एससी, एसटी प्रमाणेच ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व अॅट्रॉसिटी अॅक्टसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करीत आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, भकट्या विमुक्त जाती-जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याद्वारे संरक्षण देण्यात यावे, २००५ पासून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, एससी, एसटी व ओबीसीच्या राखीव जागांवरील नोकरीतील अनुशेष त्वरीत भरावा, मुस्लीम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करावे, एससी,एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाईच्या निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी व त्यांच्या प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, ज्या उद्योगपतींना कर्जमाफी देण्यात आली त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्यात यावी अशा मागण्या आहेत. याशिवाय मुलींच्या वसतीगृहावर महिला अधिक्षीकेची नियुक्ती करण्यात यावी, कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना कायम नेमणूक देवून सेवेत कायम करावे, कंत्राटी भरती त्वरीत बंद करून कायम सेवा भरती करण्यात यावी, विनाअनुदानीत शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरीत अनुदान देण्यात यावे, सर्व स्पर्धा परिक्षांमार्फत आवश्यकतेनुसार पदभरती करण्यात यावी आदि मागण्या या मोर्चात केल्या जाणार आहेत. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.
बहुजन क्रांती मोर्चा गुरूवारी
By admin | Published: January 11, 2017 2:02 AM