गोंदिया : जिल्ह्यात एकमेव असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वर्षाकाठी ७ हजारांवर प्रसूती होतात. दररोज ७ ते १५ च्या घरात सिझर आणि दहा ते १५ सामान्य प्रसूती होतात. परंतु, गंगाबाईत येणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांकडून तेथील वर्ग चारचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाहीत.
प्रसूतीनंतर जन्माला आलेले बाळ नातेवाइकांना दाखविण्यासाठी त्यांना ‘खुशी’ म्हणून त्यांच्याकडून पैसे मागितले जातात. मुलगा झाला तर नातेवाईकही ‘खुशी-खुशी’ अधिक पैसे देताना दिसतात आणि मुलगी झाली तरी निदान शंभर रुपये तरी त्यांच्याकडून मिठाई खाण्याच्या नावावर घेतले जातात. आम्ही दोन लोक आहाेत, तीन लोक आहोत असे दाखवून बाळंतीण महिलेच्या पतीकडून किंवा नातेवाइकांकडून घेतात. डॉक्टर प्रसूती कक्षात असताना गंगाबाईतील वर्ग चारचे कर्मचारी प्रसूती कक्षातून बाहेर येऊन पैशांसाठी बाळंतिणीच्या नातेवाइकाच्या मागे लागतात.
‘लोकमत’च्या पाहणीत काय आढळले?
-गंगाबाईत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी पाय ठेवताच त्यांच्या नातेवाइकांना कसे लुटता येईल यासाठी पाहिले जाते. आधीच गर्दी राहत असल्याने तुमच्या रुग्णाला बेड मिळणार नाही, मी बेड मिळवून देतो, त्यासाठी मला चहापाण्याचा खर्च द्या म्हणून शंभर, दोनशे रुपये गर्भवतींच्या नातेवाइकांकडून आधीच घेतले जातात.
- प्रसूती होताच बाळ दाखविण्यासाठी पैसे मागितले जातात. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचे बाळ व माता तासन्तास स्ट्रेचरवर पडूनच असते. तिला शस्त्रक्रियापश्चात वॉर्डात नेले जात नाही. ही विदारक अवस्था गंगाबाईत दिसून आली.
‘खुशी’ घेणारे कर्मचारी म्हणतात...
- आम्ही पैशासाठी तगादा लावत नाही. आम्ही त्यांच्या रुग्णांची सर्व कामे करीत असल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक स्वच्छेने पैसे देतात.
- घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने ‘खुशी’ म्हणून मुला-मुलीचे आई-वडील, आजोबा, आजी पैसे देतात. त्यांच्याकडून काही मोठी रक्कम घेत नाही.
- आम्हाला मिळणारे पैसे हे आनंदातून देण्यात येतात. मुलगा किंवा मुलगी झाल्याचा आनंद होत असल्याने गोडधोड खाण्यासाठी किंवा चहापाण्याचा खर्च म्हणून ते देतात.
कुठल्याही रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले जात नाहीत. कुणी पैसे घेत असतील तर त्याची तक्रार थेट अधीक्षक कार्यालयात करावी. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- डॉ. सागर सोनारे, अधीक्षक बाई गंगाबाई रुग्णालय, गोंदिया