गोंदिया : आपल्याला प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हलेंटाइन डे उद्या रविवारी साजरा होत आहे. या दिवसाबद्दल विशेष म्हणजे तरुणाईमध्ये फार उत्साह असतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली वर्षभर महाविद्यालये बंद होती. त्यामुळे आपल्या प्रिय मित्र-मैत्रिणींना मागील वर्षभर प्रत्यक्ष भेटता आले नाही. मोबाइलवरून व्हिडिओ कॉल करून भेटी, गप्पा-गोष्टी सुरू होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. अशातच रविवारी व्हॅलेंटाइन डे असल्याने तो साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, पाश्चात संस्कृतीचे अनुकरण नको म्हणून बजरंग दलाने याला विरोध केला आहे.
बजरंग दलाने प्रेमाला विरोध नसून अलीकडे याला चुकीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने याचा विरोध करीत असल्याचे म्हटले आहे. प्रेम दिवस साजरा करायचा असेल तर भगवान श्रीकृष्णापासून प्रेरणा घेऊन तो साजरा करावा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्यापासून प्रेम आणि समर्पणाची भावना आत्मसात कयन तो साजरा करावा. मात्र, व्हॅलेंटाइन डे च्या नावावर कुठलीही अश्लीलता बजरंग दल खपवून घेणार नाही, असा इशारा बजरंग दल प्रमुख रमन सिंघल यांनी दिला आहे. तर दुसरीकडे तरुणाई व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करायचा, आपल्या प्रिय व्यक्तीला काय भेट द्यायचे याचे नियोजन करत आहे. त्यामुळेच शहरातील बाजारपेठ प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गुलाब पुष्प आणि भेट वस्तूंनी सजली आहे. बाजारपेठेत काही दुकानांमध्ये खास व्हॅलेंटाइन डेनिमित्त भेटवस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, तर व्हॅलेंटाइन डे ला होणारी गुलाब पुष्पांची मागणी लक्षात घेऊन येथील विक्रेत्यांनी गुलाबाच्या फुलांची मागणी केली आहे. त्यामुळे विरोध आणि प्रेमाच्या वातावरणात रविवारी व्हॅलेंटाइन डे साजरा होणार आहे.
.......
प्रेम दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करणार
वन डे सायकल डे संस्थेच्या वतीने व्हॅलेंटाइन डे मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी आपल्या आई-वडिलांचे पूजन करून हा दिवस साजरा करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे, तर याच दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गोंदिया ते डोंगरगड सायकलवारीसुद्धा काढली.