पूर्वी प्रत्येक गावखेड्यात शेतीच्या कामासाठी बैलबंडी, लग्न समारंभासाठी खाचर, दमणी, पटासाठी छकड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. शेतीच्या कामासाठी बैलबंडीशिवाय आधार नव्हता. एखाद्या गावात मोटारसायकल, बायसिकल असणाऱ्या व्यक्तींना गावचा पाटील समजत असे. ज्यांच्याकडे दोनचार बैलबंड्या, दमनी, खाचर, छकडा अशी साधने असायची तो गावचा श्रीमंत व्यक्ती समजला जात असे. मात्र आता काळ झपाट्याने बदलला आहे. या यंत्रयुगात जमीनदार व श्रीमंत पाटील या विनाकागदी उपाध्या नाहीशा झाल्या. घुंगराच्या आवाजात डौलाने धावणारी बैलजोडी आज पडद्याआड झालेली आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या वाहतुकीचे साधन बैलबंडी नाहीशी होऊन तिची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. खाचर, दमनी यांची जागा मोटारसायकने घेतली आहे. त्यामुळे बैलबंडीसारखी साधने इतिहासजमा झाली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बोटावर मोजण्याइतक्या बैलबंडी दिसून येत आहेत. ट्रॅक्टरशिवाय शेतीची कामे शेतकरी करीत नाहीत.
बैलबंडी, खाचर, छकडा, दमनी झाले इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:54 AM