गोंदिया : अवघ्या दहा दिवसांनी रोहणी नक्षत्राला सुरुवात होत असून, खरीप हंगाम तोंडावर आला असताना, कडक निर्बंधामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतात नांगरणी करण्याचे व खत टाकण्याचे काम शेतकरी करीत आहेत.
२४ मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात पाऊस आल्यास शेतकरी मशागतीला सुरुवात करतात. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, रासायनिक खते घेण्याची लगबग सुरू होते. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध असल्याने बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्याला घरी असलेला शेतमाल विकल्याशिवाय पर्याय नाही. जिल्हाबंदीमुळे शेतमालाला भाव नाही अशातच खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव कशी करावी, ही चिंता पडली आहे. मोटार पंपाची कामे करावी, तर दुकान बंद, कृषी केंद्रे बंद. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. पीक कर्जासाठी अर्ज करणारे शेतकरी रांगेत प्रतीक्षा करीत असताना मागील दहा दिवसांपासून कर्ज मिळत नाही. कडक निर्बंध लावलेले ते पुन्हा वाढले, तर शेतकरी खरीप हंगामाला सामोरा कसा जाणार? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. महागडे बियाणे व खते घेणे आहे. रोहिणी बरसल्या की शेतात पेरणीला सुरुवात होते आणि अशात कडक निर्बंध पाहता खरीप हंगाम कसा कारायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.