लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळाच्या गोंदिया व नागभीड सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे गोंदिया ते नागभीड दरम्यान गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया ही पॅसेंजर गाडी प्रथमच विजेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया ही प्रवासी गाडी विजेवर चालविण्यात आली.गोंदिया ते नागभीडपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे शुक्रवारी प्रथमच सोडण्यात आलेल्या गाडीचा प्रवास खूप वेगळाच होता, असा अनुभव या गाडीतून प्रवास करणाºया प्रवाशांनी व्यक्त केला. गोंदिया-बल्लारशाह प्रवासी गाडी जेव्हा प्रत्येक स्थानकावर पोहोचत होती, तेव्हा प्रत्येक प्रवासी व नागरिक वेगळ्याच नजरेने तिला बघत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. रोज अर्धा तास उशिरा येणारी गाडी आज लवकर कशीकाय आली, अशी संपूर्ण ट्रेनमध्ये एकच चर्चा होती. या मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या मनात होता. ‘आता तरी आम्ही लवकर आमच्या घरी पोहचू,’ याचा आनंद त्यांच्या चेहºयावर झळकत होता.गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे स्थानकादरम्यान धावत असलेल्या गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया प्रवासी गाडीच्या वेळापत्रकात विद्युतीकरणामुळे गोंदिया व नागभीडदरम्यान २५ आॅगस्ट पासून आंशिक परिवर्तन करण्यात आले आहे. मात्र नागभीड ते बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या दरम्यान वेळापत्रकात कसलाही बदल होणार नसल्याचे रेल्वेने कळविले आहे. गोंदिया ते नागभीडदरम्यान गणखैरा, हिरडामाली, पिंडकेपार, गोंगले, खोडशिवनी, सौंदड, गोंडउमरी, देवलगाव, बाराभाटी, अर्जुनी, वडेगाव, अरूणनगर, वडसा, चिचोली बु.,ब्रह्मपुरी व किरमिटी मेंढा या स्थानकांचा समावेश आहे. गोंदिया-बल्लारशाह (५८८०२) गाडी गोंदियातून सकाळी ७ वाजता सुटून व सदर स्थानकांवरून नागभीडला सकाळी १०.०१ वाजता पोहोचली. तर बल्लारशाह-गोंदिया (५८८०१) गाडी नागभीडवरून सायंकाळी ४.५२ वाजता सुटेल व रात्री ८.३० वाजतापर्यंत गोंदियाला पोहोचेल, असे रेल्वेने कळविले आहे.वेळेची बचत होणारगोंदिया-बल्लारशाह मार्गावर डिझेलवर गाडी धावते. त्यामुळे ही गाडी बल्लारशाहपर्यंत पोहचण्यास खूप वेळ लागत होता. प्रवाशांच्या दृष्टीने ते थोडे गैरसोयीचे होते. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करुन डिझेलऐवजी विजेवर चालणारी गाडी सुरू करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी लावून धरली होती. यासाठी रेल्वे मंत्र्यालयाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. त्यानंतर मागील तीन-चार वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. आता गोंदिया ते नागभीड दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळाने या मार्गावर शुक्रवारपासून (दि.२५) गोंदिया ते नागभीडदरम्यान गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया प्रवासी विजेवर चालविण्याचा निर्णय घेतला. आता नागभीड ते बल्लारशाहपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळेची मोठी बचत होणार आहे.
बल्लारशाह गाडी नागभीडपर्यंत धावली विजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:05 AM
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळाच्या गोंदिया व नागभीड सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.
ठळक मुद्देगोंदिया-बल्लारशाह गाडी : नागभीडपर्यंत झाले विद्युतीकरण, प्रवाशांच्या चेहºयावर आनंद