आमगाव : आमगाव तालुक्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. यानंतर ही पाईपलाईन आता दुरुस्ती करण्यात आली आहे.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आमगाव - देवरी मार्गावरील पोवारी टोला गावाजवळ फुटली. पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे ४८ गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मागील चार पाच दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतात वाया गेले आहे. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना खूप जुनी असून नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे पाणीपुरवठा ठप्प पडत असतो. कधी पाणीपट्टीचे थकीत असलेले पैसे न दिल्यामुळे तर कधी विद्युत बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. मे महिन्याचा दुसरा आठवडा, भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरूवातीस ४८ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाईपलाईन फुटून दोन दिवस लोटूनही अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
.......
रस्त्याच्या कामामुळे समस्या
आमगाव शहरात रस्ता बांधकाम सुरू असल्याने आठवड्यातून एक वेळा तरी कुठेना कुठे पाईपलाईन फुटत असते व त्यावर खर्च चालूच असतो. मात्र दोन दिवसापासून पाईपलाईन फुटली असून याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागाचे भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे.