देवरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना करीत जड अंतकरणाने १० दिवसांच्या गणरायाला रविवारी (दि.१९) निरोप देण्यात आला. ढोल-ताशाविनाच गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी गणेश भक्तांनी कोरोनाचे संकट दूर करा, असे साकडेही घातले.
गणेश चतुर्थीला शहरात ६ सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त घराघरांत शेकडो गणपती विराजमान झाले होते. घरोघरी भाद्रपद चतुर्थीला शुक्रवारी गणपती मूर्तीचे आगमन झाले होते. गेले २ दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कोरोनामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करीत अनेक भाविकांनी १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला. प्रशासनाकडून गणेश मूर्ती विसर्जनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले गेले होते. त्याचा मान राखत अनेकांनी नगरपंचायतने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम कुंडात तर बरेच जणांनी केशोरी व धुकेश्वरी तलावात गणेशाचे विसर्जन केले.
बॉक्स.....
गणेश भक्तांचा कंठ आला दाटून
गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत छायाचित्र काढले, तर कुणी सेल्फी काढला आणि त्यानंतर गणरायांचा निरोप घेतला. घरातून गणरायांची मूर्ती घेऊन भाविक निघताना गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया, एक दोन तीन चार...गणपतीचा जयजयकारच्या घोषणा दिल्या. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचा कंठ दाटून आला होता.