नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या निराधारांसाठी असलेल्या योजनांपासून कोसो दूर असलेल्या निराधार, विधवा, दिव्यांग व वृद्धांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ हजार निराधारांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरापासून ते तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दीनदुबळ्या लोकांच्या घरी भेट देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही याची पाहणी केली. हे काम सतत सुरूच आहे. ज्या गावात तहसीलदार किंवा इतर अधिकारी पोहोचले तर कोणत्या गरिबाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही याची चौकशी केली. त्या चौकशीत जे गरजू शासकीय योजनांपासून वंचित होते त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्वरित लाभार्थ्यांच्या घरातूनच ऑनलाईन अर्ज करून त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण केली. जिल्ह्यातील ५ हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. ग्रामीण भागातील अनेकांना अर्ज कसे करावे, काय कागदपत्र जोडावे याची कल्पना नसल्याने त्याचा गैरफायदा समाजातील काही दलाल घेत होते. या दलालांकडून गोरगरिबांचे आर्थिक शोषण होत होते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी खवले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील निराधारांसाठी ‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम फायद्याचा ठरत आहे.
अर्जुनी-मोर. आघाडीवर तर सडक-अर्जुनी तालुका पिछाडीवरजिल्ह्यातील किंवा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी गावात गेले तर त्यांना अशा गरजूंना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत निराधार असलेल्या ५ हजार लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याने १२२८ लाभार्थी शोधून सर्वाधिक लाभ देणारा पहिला तालुका आहे. तर सडक-अर्जुनी २५५ लोकांना लाभ देऊन जिल्ह्यात सर्वात मागे आहे. गोंदिया शहरातील ६६१, गोंदिया ग्रामीण भागातील ५३२, तिरोडा ४८१, गोरेगाव ३४५, सालेकसा ३०८, आमगाव तालुका ३०३, देवरी तालुक्यातील ८६६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
कार्यालयाची पायरी न गाठता योजनेचा लाभग्रामीण भागातील अनेक लोक संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेपासून वंचित आहेत. अनेकांना या लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसे करावे याची माहिती नसते. हे अर्ज करणे त्यांच्या समोर मोठे आव्हान होते. अनेक गरजू लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयाची पायरी चढून चपला झिजविल्या. परंतु आता तहसील कार्यालयाची पायरीही न चढताच या योजनांचा लाभ त्यांना प्रशासन त्यांच्याच दारी जाऊन देत आहे.
दीनदुबळ्यांना त्यांच्या हक्काची शासन योजना मिळावी या हेतूने ‘गृहभेट आपुलकीची’ उपक्रम सुरू करण्यात आला. गरजूंना योजनेचा लाभ कसे घेतात हे देखील माहिती नव्हते. त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवून आतापर्यंत ५ हजार निराधारांना लाभ देण्यात आला आहे. पुढेही लाभ देणे सुरूच राहील.-राजेश खवले, जिल्हाधिकारी गोंदिया.