गोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषदेच्या ४३ तर, आठ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६३१ उमेदवार रिंगणात असून याच उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वाधिक उमेदवार गोंदिया तालुक्यात आहे. याच तालुक्यातील विजयाचे समीकरण जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाबी कुणाकडे राहणार हे ठरविणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणुका होणार की नाही यावरून अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बुधवारपर्यंत अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली नव्हती. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला घेऊन दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका होणार हे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीसाठी १३ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. पण सहा जागांवर काहींनी आक्षेप घेतल्याने यावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आता अंतिमत: किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यात आता लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वांचे लक्ष गोंदिया तालुक्याकडे
जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागा गोंदिया तालुक्यात आहे. सर्वाधिक जागा याच तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि चाबी अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लढतीत जो बाजी मारेल तो जिल्हा परिषदेच्या सत्तेची चाबी निश्चित करेल हे निश्चित आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.