गोंदिया : सहकारी संस्थेकडून देवरी तालुक्यात ग्रामपंचायतींना विविध शासकीय योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाकरिता ग्रामपंचायतीकडून निविदा झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे कामे संस्थेमार्फत करण्यात येते. या साहित्य पुरवठ्याचे बिल काढण्याकरिता लाच मागणाऱ्या देवरीचे खंडविकास अधिकारी चंद्रमणी लक्ष्मणराव मोडक (५७) यांंना ६५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई २ मार्च रोजी गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन २०१७ या आर्थिक वर्षांमध्ये भागी व पिंडकेपार येथे रस्ते बांधकाम व खडीकरणाचे काम मंजूर झाले होते. या कामांना ग्रामपंचायतीकडून टेंडर मिळाल्यानंतर तक्रारदार यांच्या संस्थेने दोन्ही ग्रामपंचायतींना या कामाकरिता अंदाजे ३८ लाख रुपयांचे साहित्य पुरवठा केले होते. दोन्ही ग्रामपंचायतीची बिले मंजुरीकरिता तक्रारदाराकडून या आधी ३० हजार रुपये घेतले होते. उर्वरित ६० हजार रुपये व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत भागी/शिरपूरकरिता मंजूर झालेल्या १० लाख रुपयाच्या कामाकरिता सही करून ईस्टिमेट दिल्याच्या मोबदल्यात याआधी १० हजार रुपये घेतले. उर्वरित १० रुपये देणे होते. असे एकूण ७० हजार रुपयांची लाच मागितली.
परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने १७ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली. पडताळणीअंती २ मार्च रोजी सापडा रचून देवरीच्या पंचायत समिती कार्यालयात ६५ हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. बीडीओ विरोधात देवरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहाय्यक फौ.शजदार खोब्रागडे, पोलीस हवालदार राजेश शेंद्रे, नायक पोलीस शिपाई राजेंद्र बिसेन, मंगेश कहालकर, संतोष बोपचे, संतोष शेंडे, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले, नायक पोलीस शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली.