गोंदिया : पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह होत असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्यच आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही, तर कदाचित पाऊसही पडणार नाही. शिवाय प्राणघातक असली तरी आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती खबरदारी बाळगून आपण अवश्य थांबवू शकतो.
विजा कडाडत असताना काय करावे?
- एकाचवेळी जास्त व्यक्तींनी एकत्र उभे राहू नये. दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर राहील, याची काळजी घ्या.
- चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच थांबावे. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
काय करू नये
- खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात. झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर आदीजवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
वीज पडल्यास काय करावे?
- अशावेळी त्वरित जमिनीवर ओवणे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा. धातूच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.
- धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा. टेलिफोन किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नका. दोनचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल, तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.
घरात काय काळजी घ्यावी?
पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी. शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
विजा चमकत असताना आपण बाहेर असाल, तर पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
- राजन चौबे, आपत्ती व्यवस्थापन अधिकरी, गोंदिया.