गोंदिया : आपण पतंग उडविण्याचे शौकीन असाल तर नायलाॅन मांजाचा वापर करू नका. आपला आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. कारण पतंग उडवताना तुटलेला मांजा सहजरीत्या चिमण्यांना उपलब्ध होतो. त्यामुळे त्या मांजाचाच वापर चिमण्या घरटे तयार करण्यासाठी करतात.
परिणामी त्या घरट्यासाठी वापरलेल्या मांजात चिमण्या व त्यांच्या पिल्लांचे पाय अडकून त्यांचा मृत्यू हाेतो. चिनी मांजा पक्ष्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. नायलॉन मांजामुळे पशु, पक्षी आणि मनुष्याच्या जीवितास धोका असल्यामुळे या मांजाची विक्री आणि वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही कुणी मांजा वापरत असेल तर खबरदार, आपल्यावर गोंदिया शहर पोलिस लगेच कारवाई करतील.
मकर संक्रांतीला पतंग उडवले जातात. मात्र, त्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात येत असल्याने पशु-पक्षी जखमी होत असतानाच कित्येकांचा जीव गेल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना मांजा विक्रेत्यांवर कारवाई करून मांजा जप्त करण्याचे आदेश दिले.
त्यापार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नायलॉन मांजा विक्री, साठा आणि वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुले पतंगाच्या मागे पळतानादेखील अपघातग्रस्त होतात व अशात त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. नायलॉन मांजा हा पर्यावरणासाठी हानीकारक असतो. तो लवकर तुटत नाही तसेच त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी नायलॉन मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घातली आहे.
पक्षी-प्राण्यांसह माणसाला धोका१) नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील पक्षी-प्राण्यांसह माणसाला धोका आहे.
२) गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे तसेच नाक, कान व गालावर गंभीर जखमा माणसाला होतात.३) दुचाकीस्वार नायलॉन मांजात अडकून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
साठा व विक्रीवर बंदी
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नायलॉन मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी दिला आहे.
मागील वर्षी १८ गुन्हे दाखल
जिल्ह्यात मांजा विक्रीसंदर्भात मागील वर्षी पहिल्यांदाच १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गोंदिया शहर, रावणवाडी, तिरोडा, आमगाव, दवनीवाडा अशा अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केला आहे. तर यंदा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पथकाचा ‘वाॅच’
नायलॉन मांजामुळे जीव धोक्यात येत असल्याने व यावर बंदी असूनही अनेक लोक त्याची सर्रास विक्री करतात. त्यांच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे.नायलॉन मांजा कुणी विकत तर नाही ना याची गस्त घालणारे पोलिस चौकशी करत असतात. अनेकदा ग्राहक बनून ते मांजा विक्री करणाऱ्यांना पकडतात.
मांजा ठरतो अपघाताचे कारण
नायलॉन मांजा मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या पतंगबाजीत वापरला जातो. यात पक्ष्यांचा गळा कापला जातो. परिणामी पक्ष्यांचा मृत्यू होतो. घराच्या छतावरून मांजाच्या सहाय्याने पतंग उडवताना त्याच परिसरातून जाणाऱ्या पक्ष्यांच्या गळ्याला मांजा अडकला की त्यांचा गळा कापला जातो. - चार वर्षांपूर्वी मांजामुळे पक्ष्यांचे गळे कापले गेले होते. कबुतर, कावळे, चिमण्या व इतर पक्षी जखमी झाले आहेत. नायलॉन मांजाचा वापरच होऊ नये.
नायलॉन मांजाच्या कारवाईला आम्ही सुरूवात केली आहे. काल एका किराणा दुकानात नायलॉन मांजाची विक्री करत असताना दुकानदाराकडून ४ बंडल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. - चंद्रकांत सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक, गोंदिया शहर.