गोंदिया : दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी होऊन बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त झाली होती. ही आकडेवारी बघून कोरोनाचा जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसून येत होते. मात्र, नववर्षाच्या चौथ्या दिवसापासून हे चित्र पालटल्याचे दिसत आहे. सोमवारपासून (दि. ४) जिल्ह्यात मात करणाऱ्यांची संख्या कमी व बाधितांची संख्या जास्त अशी आकडेवारी असून, हे धोक्याचे संकेत दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून गुरुवारपर्यंत (दि. ७) बाधितांची संख्या १३८४४ एवढी झाली आहे. मात्र, यातही दिवाळीनंतर जिल्ह्यात दिलासादायक स्थिती निर्माण झाली होती. बाधितांची संख्या नियंत्रणात दिसून येत होती, तर त्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढल्याने आजघडीला जिल्ह्यात २५९ क्रियाशील रुग्ण आहेत. एकंदरीत बाधितांची संख्या कमी व कोरोनावर मात करणारे जास्त अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती. जिल्हावासीयांचे टेन्शन कमी झाले होते. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले होते व जिल्ह्यातून कोरोना गेला असे चित्र दिसून येत होते.
नववर्षाची सुरुवातही चांगलीच झाली होती व २०२१ मध्ये कोरोना हरणार असे वाटत होते. मात्र, सोमवारपासून (दि. ४) हे चित्र पालटल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून सातत्याने बाधितांची स्ंख्या जास्त व मात करणारे कमी अशी आकडेवारी येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना पुन्हा आपले डोके वर काढत आहे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मृतांची आकडेवारीही वाढू लागली असल्याने ही बाब जास्त चिंताजनक आहे.
-------------------------------
जिल्हावासीयांकडून होत आहे अतिरेक
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे हे खरे असले तरी कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही हेसुद्धा तेवढेच सत्य आहे. मात्र, ही बाब बाजूला सारून जिल्हावासीयांकडून अतिरेक होऊ लागला होता. कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल देत जनता स्वच्छंदपणे वागू लागली आहे. परिणामी कोरोनाचे चित्र पुन्हा पालटू लागले आहे. हे धोक्याचे संकेत असून, आता नागरिकांनी मास्क, शारीरिक अंतर व स्वच्छतेचे पालन करण्याची गरज आहे.
--------------------------------
१२३ बाधितांची भर, तर १०१ रुग्णांनी केली मात
जिल्ह्यात सोमवारपासून (दि. ४) बाधितांची संख्या जास्त व कोरोनावर मात करणारे कमी अशी स्थिती दिसून येत आहे. अशात सोमवार ते गुरुवार (दि. ७) या चार दिवसांच्या कालवधीत जिल्ह्यात १२३ नवीन बाधितांची भर पडली असून, १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.