गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाने आता सर्वच तालुक्यात आपले पाय पसरल्याचे चित्र आहे. जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यात कोरोना बाधित आढळल्याने संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.६) जिल्ह्यात १६ नवीन बाधितांची नोंद झाली तर १० बाधितांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या १६ बाधितांमध्ये गोंदिया ४, तिरोडा २, गोरेगाव ४, आमगाव २, देवरी तालुक्यातील ४ बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात पुन्हा हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७३,२५१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६१,४१५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. या अतंर्गत ६९७९९ बाधितांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६३५७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४५३० कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४१७५ नमुने निगेटिव्ह आले आहे. सद्यस्थितीत १६९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हावयाचा आहे.