गोंदिया : बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणापासून आतापर्यंत स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवेला आता १३ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या सुरक्षारक्षकांची कोणतीही चूक नसताना विमानतळ प्रकल्पाने या सर्वांना अचानक कामावरून बंद केले. यासाठी प्रकल्पाने या सुरक्षारक्षकांना कोणतीही सूचना किंवा नोटीस दिली नाही. हा आपल्यावर झालेला अन्याय असून, न्यायासाठी मंगळवारपासून (दि.१९) बिरसी विमानतळासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती विशाल सुरक्षा मजदूर संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सन २००७ मध्ये बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा परिसरातील स्थानिक नागरिकांना या प्रकल्पातील रोजगारात सामावून घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन विमानतळ तथा जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार परिसरातील युवकांना सुरक्षारक्षक म्हणून कामावर घेण्यात आले. त्यांच्या सेवेला आज तब्बल १३ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. अशात त्यांना कोणतीही सूचना न देता विमानतळ प्रकल्पाद्वारे कामावरून पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.
केंद्र शासनाच्या प्रकल्पात ९० टक्के एक्स सर्व्हिस मेन सुरक्षारक्षक म्हणून असणे आवश्यक आहे. असे असतानाही सन २००७ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील अधिकारी व जिल्हा प्रशासनाने याची माहिती स्थानिक जनतेला का दिली नाही. आता डीजीआरचा उपयोग करीत सर्व सुरक्षारक्षकांना कामावरून बंद केले आहे. सन १९९४ पासून डीजीआर अस्तित्वात आहे, तर सन २००७मध्ये या प्रकल्पात स्थानिकांना का म्हणून कामावर घेण्यात आले ? असा प्रश्नही या सुरक्षारक्षकांनी उपस्थित केला आहे. स्थानिकांना केवळ भूलथापा देण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी माहिती दडवून ठेवली नाही, असा आरोपही या सुरक्षारक्षकांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत विशाल सुरक्षा मजदूर संघटनेचे अध्यक्ष अनिल भेंडारकर, सचिव पंकज वंजारी, उपाध्यक्ष बसंत मेश्राम, कार्यवाहक सतीश जगने, ऋषीमुनी पटले, लोकचंद मुंडेले, रामेश्वर चौधरी, गोविंद तावाडे, अनिल मंदरेले, मंगलेश मुंडेले, डिगंबर मेश्राम, सदाशिवा पाथोडे उपस्थित होते.