नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अभ्यासात विद्यार्थी मागे असेल तर त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. अनेकदा त्यांना ओरडून परिस्थितीनुरूप शिक्षा केली जाते; परंतु आरटीई कायद्यांतर्गत मानसिक, शारीरिक छळ या कायद्याखाली शिक्षकांना शिक्षा होऊ शकते. यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणे बंद केले आहे. सध्या शिक्षक व विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना आता शिक्षकांची भीती राहिली नाही. गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र मारायचे बंद केले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात. मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनवणी पालकांकडून होत असल्याने शिक्षकांनीही मुलांना मारणे बंद केले. विशेष म्हणजे, पूर्वी शिक्षकांनी मुलांना मारले तर पालक काहीच म्हणत नव्हते. मात्र आता पालकच मारण्यासाठी विरोध करतात.
आधी तक्रारी का होत नसत? - आरटीई कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक छळ किंवा क्रूर वागणूक दिल्यास शिक्षकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, यामुळे तक्रारीची भीती शिक्षकांना आहे. - त्यामुळेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणे बंद केले आहे; मात्र यापूर्वीच्या पिढीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती असायची. चुकीसाठी शिक्षेचा पर्याय अवलंबला जात होता.
एकाच मुलाला मारहाण पण प्रकरण शिक्षण विभागाकडेच
१शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्यांच्यावर आरटीईअंतर्गत कारवाई होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे बंद केले आहे. विद्यार्थी मारहाणप्रकरणी गोंदिया जिल्ह्यात तक्रार नाही.
२मागील दीड वर्षात जिल्ह्यात एकाच विद्यार्थ्याला मारहाण झाली. त्या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आली. पोलिसात एकही तक्रार गेली नाही.
पालक काय म्हणतात?
मी माझ्या मुलांना शाळेत पाठविले. त्यांच्यात चांगले गुण यावेत, चांगला अंतर्भाव यावा परंतु गुरुजींनी त्याला मारहाण करू नये हे आम्हाला अपेक्षित आहे. आतापर्यंत मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या नाहीत.- रमेश तरोणे, पालक
मुले लेखन, वाचनात मागे पडली आहेत. त्यासाठी शिक्षक मुलांना शिक्षा करतात, हे चुकीचे नाही. आरटीई कायदा असला तरी मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक ओरडतात. शिक्षकांनी जरूर रागवावे मारहाण करू नये. - संजय कटरे, पालक
शिक्षक काय म्हणतात?
आरटीई अंतर्गत कारवाईची भीती शिक्षकांना असल्यामुळे मारहाण केलीच जात नाही. मित्रत्वाचे नाते काळानुरुप शिक्षेचे स्वरूपही बदलू लागले आहे. विद्यार्थ्यांना ओरडण्याऐवजी त्यांच्यासोबत मित्रत्वातून संवाद साधून अभ्यास करून घेण्यात येत आहे. - प्रकाश ब्राह्मणकर, शिक्षक
आपल्या मुलांना ओरडू नका, अशी विनवणी पालक करतात. मुलांना मारण्याऐवजी त्याची चूक आम्हाला सांगा, त्याला आम्ही दुरुस्त करतो. शिक्षकांच्या डोळ्यांचा अचूक अंदाज विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे त्यांना मारण्याची गरजच पडत नाही. -एस. यू. वंजारी, शिक्षक