नरेश रहिले गोंदियापारंपरिक शेती म्हणून सिंगाडा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आता उपासमारीचे संकट ओढावत चालले आहे. त्यांच्या रोजगाराकडे शासनाने सहानुभूतीने लक्ष दिले नाही. परंतु सौंदर्यीकरणाच्या नावावर सिंगाडा रोजगार संपविण्याचे कटकारस्थान महाराष्ट्र शासनाने रचले असल्याचा सूर हा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून येत आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास २०० तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते. पूर्वी तलावांची संख्या जास्त होती, परंतु आता ती संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. गावातील पाणी ज्या तलावात जाते, त्या तलावात शिंगाड्याची शेती अधिक जोमात होते. परंतु गावाशेजारी असलेल्या शासकीय तलावांचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर शासनाने पिढ्यानपिढ्या शिंगाडा शेती करणाऱ्यांचा रोजगार हिरावला आहे. शासकीय असलेल्या ७५ टक्के तलावांचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर शासनाने त्यात शिंगाड्याचा व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी जुळलेल्या लोकांवर आता बेरोजगारीचे सावट येत आहे. जिल्ह्यातील पाच हजारावर नागरिक हा व्यवसाय करीत असल्याची माहिती मच्छीमार संस्था बनगावचे सदस्य दुर्गाप्रसाद रहेकवार यांनी दिली. मे-जून महिन्यात शिंगाड्याची लागवड करण्यासाठी तलावात वेल नेऊन टाकले जातात. त्यासाठी पंचायत समितीकडून किंवा खासगी शेत मालकांकडून लीजवर तलाव घेतले जातात. साडेतीन महिन्यानंतर शिंगाड्याचे पीक येते. तो शिंगाडा व्यवसाय त्यांच्या जगण्याचे साधन आहे.रोगाचा प्रादुर्भावधानाबरोबर शिंगाड्यावर रही, मावा, करपा हा रोग येतो. त्यामुळे शिंगाड्याच्या वेलीवरील पाने गळून नष्ट होतात. ज्या तलावात शिंगाड्याची शेती केली त्या तलावात मासेमारीचा व्यवसायही करता येत नाही. शिंगाड्यांच्या वेलामुळे पाण्यातील माशांना आॅक्सिजन मिळत नसल्यामुळे तेथे माशांचा व्यवसाय करता येत नाही. शिंगाड्यावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास अनेकवेळा त्याच्या लागवडीसाठी लावलेला पैसाही निघत नसल्याची खंत आमगाव येथील हेतराम दुधबरई यांनी व्यक्त केली.
सौंदर्यीकरण हिसकावतोय सिंगाड्यांचा रोजगार
By admin | Published: December 28, 2015 1:57 AM