बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून वडेगाव ओळखले जाते. सन २००३ ते २००४ मध्ये पतंगी तलावाचे सौंदर्यीकरणाकरिता प्रशासकीय मंजुरी प्राप्त होऊन १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील निधीतून कामसुद्धा करण्यात आले. पुढील टप्प्याचे काम निधी उपलब्ध न झाल्यामुळे अर्धवट आहे. तलाव सौंदर्यीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
तिरोडा पं.स.च्या वतीने सौंदर्यीकरणाचे काम २००३ ते २००४ मध्ये मंजूर करून यासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार पतंगी तलावाच्या कामासाठी १.५० लाख रुपये मंजूर झाले; परंतु योजना निधी देणे बंद झाल्याने काम अनेक वर्षांपासून अर्धवट पडले आहे. ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच तसेच पिरीपा केंद्रीय सदस्य नागेश बडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र शासनाच्या वतीने निधी उपलब्ध नसल्यामुळे सौंदर्यीकरणाचे काम आम्ही पूर्ण करू शकत नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, याविराेधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.