सडक-अर्जुनी : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला अतिक्रमणाने विळखा घातला असून ते सर्व काढून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी सर्व बौद्ध बांधव व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांना बुधवारी निवेदन दिले.
कोहमारा-गोंदिया राज्य मार्गावर शहराच्या मध्यभागी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. परंतू पुतळ्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रम प्रसंगी नागरिकांना मुख्य मार्गावर उभे राहावे लागते. अशात एखाद्या वेळी अप्रिय घटना टाळता येत नाही. शिवाय रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही नाहक त्रास होतो. पुतळ्यालगतचे अतिक्रमण काढून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी बौद्ध बांधव व भारतीय बौद्ध महासभेने केली आहे. शिष्टमंडळात भारतीय महासभेच्या जिल्हा महासचिव नीना राऊत, तालुकाध्यक्ष वर्षा शहारे, सरचिटणीस स्वाती शहारे, संस्कार उपाध्यक्ष कविता चौधरी, शहर अध्यक्ष चंद्रकांता मेश्राम, शहर महासचिव रंजिता मेश्राम, कार्यकर्ता वीणा लाडे, सदाराम लाडे, जागेश्वर वैद्य व शहर सचिव जयंत शहारे उपस्थित होते.