शिशिर ऋतू संपल्यानंतर वसंत ऋतूची सुरुवात होत असून, दुपारच्या उन्हानंतर रात्रीच्या वेळेस थोडीफार गर्मी होत असून, पहाटेला थंड अशा वातावरणात पळस फुलांनी हे परिसर निसर्ग सौंदर्याने फुलून दिसत आहे. या जंगलव्याप्त भागातील पळसाच्या केशरी रंगाच्या फुलांनी आकर्षणात भर पाडली असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. पळसाची फुले आली की होळी, रंगपंचमीची लहान मुलांना चाहूल लागते. पळसाच्या फुलांपासून लहान-लहान रंग तयार करून रंगपंचमीला मुक्तहस्तांनी रंंगांची उधळण करतात. पळस फुले वर्षातून एकदाच उगवत असतात. पळसाला आलेली फुले मानवी मनावर आधिराज्य करून जात असतात. थंडी ओसरायला लागली की वसंत ऋतूमध्ये पानझडीने उघडी पडलेली झाडे नव्या पालवीने लेणे अंगावर धारण करून उभी दिसतात. लाल-केशरी रंगांची उधळण करणारा पळस जिकडे-तिकडे दृष्टीस पडत आहे. पळसाच्या प्रत्येक फांदीवर फुलपाखरे मध खाण्याच्या आनंदात पुन्हा-पुन्हा जगण्याची उमीद ठेवून भ्रमण करताना दिसून येतात. पळसाचे झाड हे आयुर्वेदिक वनस्पती औषधी म्हणून मानव समाज त्याचा वापर करीत असतो. असा हा बहुगुणी पळस झाड सध्या निसर्गाचे सौंदर्य फुलवत आहे.
पळसाच्या केशरी रंगाच्या फुलांनी निसर्गाचे सौंदर्य फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:32 AM