रोख २० हजारांची मदत : शालेय साहित्य भेट, अन्न धान्य पुरवणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : पूर्वीपासूनच सामाजिक कार्याचा वसा अंगामध्ये असला तर गोरगरीब, अनाथ, अन्यायग्रस्त, पीडितांना मदतीचा हात पुढे करण्यास मानवी मनाला कोणीही थांबवू शकत नाही. वेळप्रसंगी स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करुन इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याला प्राधान्य देणारे सेवाभावी महानुभवाची आजही कमी नाही. याचा प्रत्यय गोंदिया नगरात राहून अविरत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अॅड. प्रा. सविता बेदरकर यांच्या कार्यप्रणालीवरुन प्रत्यक्षात दिसून आला. निमगाव येथील अनाथ झालेल्या त्या ४ बहिणींना भेटून त्यांना मायेने कुरवाळले.या वेळी सविता बदेरकर म्हणाल्या, तुमच्या सोबत मी आहे. चिंता करु नका. शाळा शिका, आयुष्य घडवा. वेळोवेळी चार बहिणीच्या सोबतीला आई म्हणून उभी राहणार, असा एक मोठा आधार त्यांनी त्याच्या घरी भेटीप्रसंगी दिला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सूर्यवंशी कुटुंबातील दोघाही पती-पत्नीचा २०-२५ दिवसांच्या अंतराने निधन झाले. त्या दोघांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या ४ मुली पोरक्या झाल्या. पुढील आयुष्य कसे जगावे, या विवंचनेत त्या चार अनाथ लेकी पडल्या. माय-बापाचे छत्र हरपलेल्या ४ चिमुरड्या लेकींचे वास्तव चित्र लोकमतने प्रकाशित केले. त्यावरून अनेक दानशूर समोर आले. अनाथ झालेल्या ४ बहिणींचे वृत्त वाचताच गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून त्या अनाथ लेकींची जबाबदारी स्वीकारुन सर्व व्यवस्था आपण करु, असे त्यांनी सर्वप्रथम अभिवचन दिले होते. त्या अभिवचनाची पूर्तता करण्यासाठी सविता बेदरकर गोंदियावरुन निमगाव येथील त्या अनाथ बहिणींची सांत्वना करुन मायेची उब देण्यासाठी सोमवारला (दि.२६) त्याच्या घरी आल्या. सविता बेदरकर यांनी गोंदिया येथील डॉ. सचिन चौधरी (१० हजार), योजना कोतवाल (१ हजार), नानंदा बिसेन (१ हजार), रेखा भोंगाडे (१ हजार) यांच्याकडून जमा करुन आणलेले व स्वत:कडील असे २० हजार रुपये त्या अनाथ बहिणींना दिले. शाळेच्या नवीन सत्रासाठी आवश्यक असलेल्या नोटबुक, पेन, पेन्सील इत्यादी साहित्य त्या मुलींच्या हातात दिले.मायबापाचे छत्र हिरावून अनाथ झालेल्या मोहिनी (१७), स्वाती (१५), जोत्स्ना (१०), व्टिंकल (८) या चार बहिणींना आईच्या ममतेने डोक्यावर हात ठेवला व मोठ्या आस्थेने विचारपूस केली. जन्मदाते सोडून गेले असले तरी निराश होऊ नका. तुम्हाला कोणतीही अडचण भासू देणार नाही. तुम्ही जर तयार असाल तर गोंदियाला नेवून तुमच्या खाणे-पिणे, राहण्यासह शिक्षणाची जबाबदारी मी स्वत: घेतो, अशी वचनचिठ्ठीच भेटीप्रसंगी दिली. तांदूळ व किराणा घरपोच येईल याची व्यवस्था करणार, असे सांगून त्यांच्या या अल्पावधीच्या सहवासाने देवदूतरुपी आई मिळाल्याचा आभास भेटीदरम्यान त्या अनाथ मुलींना झाला. लोकमतच्या वृत्तामुळेच आपण इथपर्यंत आल्याचे सविता बेदरकर यांनी सदर प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले. यापूर्वीसुध्दा बाक्टी येथील दोन अनाथ बहीण-भावास भरभरुन मदत सविता बेदरकर यांनी केली व ती मदत आजही सुरु आहे.
‘त्या’ चार अनाथ लेकींना बेदरकर यांनी दिला मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 1:32 AM