आज ध्वजारोहण व महापूजेला सुरूवात : भाविकांचे जत्थे धनेगावात डेरेदाखल विजय मानकर सालेकसा वीस कोटी आदिवासींचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील वार्षिक यात्रेला सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येत विविध राज्यातून भाविक येथे दाखल झाले असून ९ फेब्रुवारीला ध्वजारोहण आणि महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष करून बाहेर राज्यातील आदिवासी भाविक मोठ्या प्रमाणावर धनेगाव, दरेकसा परिसरात येऊन डेरेदाखल झाले आहेत. ८ फेब्रुवारी रोजी गोंडी संस्कृती व गोंडी धर्माबाबत विविध प्रकार ऐतिहासीक तथ्य प्रकट करणारे गोंडीधर्म प्रवचन, गोंडी संस्कृतीवर आधारीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि गडजागरण कार्यक्रम घेण्यात आला. भाविकांसाठी रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर मनोरंजन व उद्बोधनाची पूरेपूर व्यवस्था आयोजन समितीने केली असून प्रत्येक भाविकाला कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने दरेकसा ते धनेगाव आणि धनेगाव ते कचारगड देवस्थान तसेच मोठ्या गुफेपर्यंत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलो आहे. पोलीस विभागाच्या वतीने एकीकडे सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे. त्याप्रमाणे गुफेकडे जाताना पहाड चढताना भाविकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस कमांडो तैनात करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांची प्रकृती बिघडल्यास किंवा अनावधानाने एखादा अपघात घडल्यास त्यांना ताबडतोब औषधोपचार मिळावे म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी आरोग्य कॅम्प व प्राथमिक उपचार व्यवस्था स्थापित करण्यात आली आहे. गरज पडल्यास अॅम्बुलन्सची सोय सुध्दा ठेवण्यात आली आहे. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थासुध्दा आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. काही संस्थांनी ब्लड कॅम्प सुध्दा लावले आहेत. स्थानिक आ. संजय पुराम यात्रा सुरु होण्यापूर्वीपासून व्यवस्थेबाबत सतत आढावा घेताना दिसून आले. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम शिस्तबध्द होत आहे. ९ ला सकाळी गोंडी धर्म प्रचारक शीतल मरकाम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकावण्यात येईल. त्यानंतर आ. संजय पुराम गोंडवाना सामाजिक ध्वज फडकावतील या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दादा हिरासिंह मरकाम व कचारगडचे प्रवर्तक के.बा. मरस्कोल्हे भूषविणार आहेत. या वेळी गोंडी धर्मातील विविध मान्यवर धर्माचार्य, लेखक इतिहासकार व उच्च पदस्थ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यात राजे वासुदेव शाह टेकाम, चंद्रलेखा मोतीरावण कंगाली, भरतलाल कोर्राम, मनमोहन शाह वट्टी, डॉ.हरिश्चंद्र सलाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कचारगड यात्रेला सुरूवात
By admin | Published: February 09, 2017 1:00 AM