लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याच्या ग्रामविकास विभागाने तब्बल तीन महिन्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक ही जुन्याच आरक्षणानुसार घेण्याचे पत्र मंगळवारी काढले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ओबीसी जागा सर्वसाधारण करून या निवडणुका घेण्यात येणार आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दीड वर्ष लांबणीवर गेली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले. तसेच ओबीसी जागा रद्द करुन त्या सर्वसाधारण करून निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळेच जिल्ह्यात डिसेंबर आणि जानेवारी असे दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर झाला. त्यानंतर १५ दिवसात जि.प.अध्यक्ष आणि पं.स.सभापती पदाची निवडणूक पार पडणे अपेक्षित होते. पण ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने अध्यक्ष आणि सभापतीपदाची निवडणूक ही जुन्या आरक्षणानुसार घ्यायची की नव्याने आरक्षण काढायचे असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने यावर ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागितले होते. मात्र ग्रामविकास विभागाने यावर आपले मार्गदर्शन कळविण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा कालावधी लावला. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी यासंदर्भातील पत्र मंगळवारी (दि.१२) काढले. त्यानंतर आता जि.प.अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानंतर जिल्हा निवडणूक विभागाने देखील निवडणूक घेण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली आहे.
पंधरा दिवसात पार पडणार प्रक्रिया - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आठही पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक ही येत्या १५ दिवसात घेण्यात येणार आहे. दोन पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण नामाप्र होते. ते सर्वसाधारण करून आठही पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक घेतली जाणार आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग - ग्रामविकास विभागाच्या पत्रानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. अपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजप हा आकडा गाठू शकतो. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. मात्र तशी शक्यता कमी आहे.