गोंदिया : काेरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासनाने मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची सर्वाधिक परवड झाली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत केशरी लाभार्थ्यांना सुद्धा अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात या योजनेंतर्गत धान शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जून महिन्यात या योजनेंतर्गत धान्याचे वाटप करण्यात येणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकधारकांना जून महिन्यात स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येणार असून याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख २३ हजार शिधापत्रिकाधारक म्हणजे जवळपास १० लाख नागरिकांना मिळणार आहे. यासाठी धान्याचे नियोजनसुद्धा करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वाटप केले जाणार आहे.
.........
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकाधारक : २ लाख ८० हजार १२३
बीपीएल शिधापत्रिकाधारक : १ लाख ४८ हजार
अंत्योदय शिधापत्रिकाधारक : ७९ हजार
केशरी शिधापत्रिकाधारक : ४८ हजार
...........
काय मिळणार?
गहू प्रति माणशी : २ किलो
तांदूळ प्रति माणशी : ३ किलो
........................
-बीपीएलच्या १ लाख ४८ हजार कुटुंबांना लाभ
-जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार १२३ विविध योजनेचे शिधापत्रिकाधारक आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार बीपीएल शिधापत्रिकाधारक आणि ७९ हजार अंत्योदयच्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
- या योजनेंतर्गत या दोन्ही लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने नियोजनसुद्धा केले आहे.
- जून महिन्यात प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू याप्रमाणे एका शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
...............
तूर्तास केशरीच्या ४८ हजार शिधापत्रिकाधारकांना वाटप
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतंर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हा निर्णय केवळ मागील वर्षी या योजनेंतर्गत ज्या जिल्ह्यात धान्य शिल्लक होते त्यांच्यासाठी लागू आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेंतर्गत मागील वर्षी धान्याचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे धान्य शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे तूर्तास या योजनेंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यात येणार नसल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
.......
कोट
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मागील वर्षी केशरी शिधापत्रिधारकांना स्वस्त धान्याचे वाटप करण्यासाठी ३ हजार मेट्रिक टन धान्य प्राप्त झाले होते. जिल्ह्यात या धान्याचे वाटप मागील वर्षीच करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचे धान्य शिल्लक राहिले नाही. ज्या जिल्ह्यात धान्य शिल्लक होते त्याच जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाणार आहे.
- देवीदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.
................