गोरेगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरीब, गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. योजनेची अंमलबजावणीही मोठ्या थाटात करण्यात आली; परंतु केंद्राचे अनुदान अडकून पडल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. मागील ३ वर्षांपासून गोरेगाव नगर पंचायतअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून घरकुल योजनेचे अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या घराचे काम अर्धवट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २ ते ३ वर्षांपासून गोरेगाव नगर पंचायतअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करून लाभ देण्यात आला. योजनेंतर्गत दोन लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. यामध्ये केंद्र व राज्य सरकार यांचा वाटा असतो. गोरेगाव नगर पंचायतने आतापर्यंत राज्य सरकारच्या अनुदानांतर्गत एक लाख २० हजार ते एक लाख ६० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले; परंतु केंद्राच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना चांगलाच फटका बसला आहे. यासंदर्भात नगर पंचायतकडे विचारणा केली असता केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले.
काही दिवसांनंतर पावसाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम रखडले आहे. केंद्राच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत घराचे काम अर्धवट राहिले आहे. यामुळे पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होणार आहे. यासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पार्टी तालुका कौन्सिलच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते, तसेच खासदार सुनील मेंढे व आमदार विजय रहांगडाले यांना परिस्थिती लक्षात आणून देण्यात आली होती; परंतु अद्यापर्यंत लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत केंद्र शासनाचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मिळेल यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.