तिरोडा : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सर्रा येथील २३ लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान २ वर्षांपासून प्राप्त झाले नव्हते. लाभार्थ्यांनी रविकांत बोपचे यांना निधी मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर ग्रामपंचायतला निधी प्राप्त झाला आहे.
सन २०१९-२० मध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत सर्रा येथील २३ गरजूंना शौचालय मंजूर करण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांनी बांधकामसुद्धा पूर्ण केले होते; परंतु मागील २ वर्षांपासून लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते. याबाबत संबंधित लाभार्थ्यांद्वारे ग्रामपंचायत सचिव व पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले; परंतु यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नव्हता. अखेर लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत बोपचे यांना शौचालयाचे पैसे मिळवून देण्याबाबत विनंती केली. यानंतर बोपचे यांनी रीतसर संबंधित गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेला सर्रा येथील स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचे पैसे मिळाले नसल्याची बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर या २३ लाभार्थ्यांना पंचायत समितीने १६ जून रोजी निधी उपलब्ध करून दिला आहे. दोन वर्षांपासूनची समस्या मार्गी लागल्याने अजय राऊत, अंकोष बोरकर, अरविंद राऊत, धनपाल बघेले, गीता नेवारे, हेमंतकुमार बघेले, हिरेंद्र बिसेन, कुवरलाल चौधरी, मुलराम चौधरी, मूलचंद पटले, नेतराम बघेले यांनी आभार मानले आहेत.