गोंदिया : विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी साफसफाईची कामे करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा व सुविधांचा लाभ मिळावा. तसेच सर्व योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. सफाई कर्मचाऱ्यांकरीता नगरपरिषदेतील बजेटमध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. त्याबाबतची अमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश राष्ट्रीय कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता ओमप्रकाश मोहतो यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा व लाभ याची माहिती घेण्याकरिता डॉ. लता मोहतो यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांना त्यांच्या कामाला मोबदला व शासकीय सुविधांचा लाभ मिळायलाच हवा. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीच्या समस्या त्यांनी यावेळी ऐकून घेतल्या.बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मोहबंशी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, पोलीस उपअधीक्षक सुरेश भोयर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे, तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गीता ठाकरे, महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.डॉ. लता मोहतो यांनी यावेळी गोंदिया नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या नवीन पदभरती, कालबद्ध पदोन्नती, डुप्लीकेट सर्विसबुक तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घर बांधकाम तसेच रमाई व इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत त्यांना घरे देण्याबाबत माहिती दिली. समाज भवनासाठी मोठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता व नाल्यांचे बांधकाम करुन देण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येक घरी शौचालयही बांधण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक माहिती घेताना त्यांनी सांगितले की, वर्षातुन दोनवेळा त्यांची आरोग्यतपासणी करण्यात यावी. त्यांच्या कामांतर्गत येणाऱ्या सुविधा त्यांना देण्यात याव्या असे सांगितले. समाजकल्याण विभागाकडून माहिती घेतांना त्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्ती योजना तसेच पुरुष व महिला बचत गटांचे शिबिर आयोजित करुन त्यांना विविध योजनांची व सुविधांची माहिती द्यावी असे निर्देश दिले. तर अंगणवाडीत शिकत असलेल्या त्यांच्या पाल्यांना पोषण आहार व तिरोडा येथील कर्मचाऱ्यांचे नियमीत पगार करण्याचे निर्देश दिले.
सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधांचा लाभ मिळावा
By admin | Published: September 11, 2014 11:38 PM