ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : जिल्ह्यात यावर्षी खरीपाच्या धानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तालुक्यातील महागाव व नवेगावबांध परिसरात गारपीट व चक्रीवादळाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि उर्वरित पीक कडीकरपा व तुडतुडा रोगाने नेस्तनाबुत झाले. तरी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. पंतप्रधान पीक योजनेचे निकष शेतकऱ्यांना डोके दुखी ठरत आहेत. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना नाही तर संबंधीत कंपन्यांसाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियानांतर्गत २२ व २३ फेब्रुवारी रोजी महागाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, पंचायत समिती सदस्य जनार्धन काळसर्पे, सुधीर साधवानी, युवा अध्यक्ष योगेश नाकाडे, डॉ. देशमुख, हुमणे, सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसची शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान यात्रा २२ व २३ फेब्रुवारी रोजी महागाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत बुटाई नं. १, बुटाई नं. २, आदिवासीटोली, बोरी, सावरी, मांडोखाल, कोरंभीटोला, अरुणनगर, गौरनगर, कोरंभी, जानवा या गावातून भ्रमण करुन आल्यावर महागाव येथे जाहीर सभा घेण्यात आली.सभेत पुढे बोलताना चंद्रिकापुरे यांनी, शेतकऱ्यांबरोबर पीक परिस्थिती, दुष्काळ, पीक विमा योजना, वाढत असलेली महागाई व बेरोजगारी बाबद चर्चा करुन सध्याचे शासन कसे निष्क्रीय आहे हे समजावून सांगितले. तसेच राज्य शासनाने गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तिनच तालुक्यांचा मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात समावेश केला आहे. यावर्षी हमी भाव धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक घटली. धान उत्पादनात जिल्ह्यात ७ लाख क्विंटलने घट झाली. एवढे होऊनही दुष्काळ घोषित करण्यात शासन सकारात्मक नसल्याचेही ते म्हणाले.
पीकविमा योजनेचा लाभ संबंधित कंपन्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 9:39 PM
जिल्ह्यात यावर्षी खरीपाच्या धानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तालुक्यातील महागाव व नवेगावबांध परिसरात गारपीट व चक्रीवादळाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि उर्वरित पीक कडीकरपा व तुडतुडा रोगाने नेस्तनाबुत झाले.
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शेतकरी दिंडी