नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत आहे. जिल्हा महाराष्ट्राच्या टोकावर आणि छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने गोंदिया जिल्ह्यातील गर्भवतींना जवळच्या राज्यात नेऊन गर्भपात केले जातात. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९२६ मुली जन्माला येत आहेत. यामुळे सामाजिक असंतुलन होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सन २०१७ मध्ये एक हजार मुलांमागे ९३३ मुली जन्माला आल्या. सन २०१८ मध्ये एक हजार मुलांमागे ९२३ मुली जन्माला आल्या. २०१९ मध्ये ९८२, २०२० मध्ये ९५५ तर सन २०२१ मध्ये ९२६ मुली जन्माला आल्या आहेत. ‘बेटी बचाव’च्या नाऱ्याला गोंदिया जिल्ह्यात काळे फासल्याचे चित्र उमटू लागले आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे सांगणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर निंबू टिचून स्त्री भ्रूणहत्या होत असताना आरोग्य विभागाची मागील तीन-चार वर्षांत एकही कारवाई नाही.
.........................
हजार मुलांमागे मुली किती?
२०१७- ९३३
२०१८- ९२३
२०१९- ९८२
२०२०- ९५५
२०२१- ९२६
..............
मुला-मुलीच्या जन्माची संख्या
२०१७- १७१४६
२०१८- २२५८५
२०१९- १६६३९
२०२०- १६०९०
२०२१- ९७१९
...............
सन-----मुली किती-------मुले किती
२०१७- ८२७७----------८८६९
२०१८- १०८४२---------११७४२
२०१९- ८२४२-----------८३९३
२०२०- ७८६०-----------८२३०
२०२१- ४६७२-----------५०४७
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लिंग निदानास बंदी
गर्भात असलेले बाळ हे मुलगा किंवा मुलगी आहे, ही तपासणी कायद्याने गुन्हा आहे. स्त्री भ्रूणहत्या होऊ नये यासाठी शासनाने लिंग निदानास बंदी करणारा कायदा तयार केला. लिंग निदान करणाऱ्या व्यक्तीला दंड आणि शिक्षादेखील होते.
.........
गरज नसताना गर्भपात करता येत नाही. गर्भात काही अडचण असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नोंदणीकृत गर्भपात केंद्रातच गर्भपात करण्यात येतो. मॉडर्न जमान्यात मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींच्या जन्माचे स्वागत करायला हवे.
- डॉ. सायास केनद्र, स्त्रीरोगतज्ज्ञ, गोंदिया.