अशोक चव्हाण यांचा इशारा : गुंडगिरीपासून शहराला मुक्त करण्याचे आवाहन गोंदिया : गोंदियावासीयांच्या विकासाची तळमळ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यात मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहात आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहराचा विकास योग्य दिशेने करण्यासाठी नगर परिषदेची सत्ता काँग्रेसच्या हाती द्या, शहराला गुंडगिरीपासून मुक्त करा, असे आवाहन करून खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपपासून सावध राहा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिला. गुरूवारी गोंदियाच्या गांधी पुतळा चौकात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश ठाकूर आणि नगरसेवकांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने आ.गोपालदास अग्रवाल, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री वसंतराव पुरके, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, बबनराव तायवाडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश ठाकूर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारची चांगलीच फिरकी घेतली. नोटाबंदीसह विविध योजना कशा फसल्या याचे विश्लेषण त्यांनी केले. या सरकारने शेतकरी, व्यापारी कोणाचेच हित जोपासले नाही असे सांगितले. आ.अग्रवाल यांनीही भाजपातील नगर परिषदेतील गुंडाराज आणि भ्रष्टाचारावर आसूड ओढले. गेल्या अडीच वर्षात भाजपच्या काही नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी गोंदिया नगर परिषदेच्या परंपरेला छेद दिला. या नगर परिषदेला चांगल्या राजकारणाची मोठी परंपरा आहे. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला छेद देत जे कमिशनराज आणले ते आता नागरिकांनी संपविले पाहीजे आणि पुन्हा एकदा नगर परिषदेला विकासाच्या वाटेवर आणले पाहीजे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, उमाकांत अग्निहोत्री, अनंतराव घारड, माजी जि.प.अध्यक्ष के.आर. शेंडे, रजनीताई नागपुरे, महिला जिल्हाध्यक्ष उषा शहारे, गोंदिया-भंडारा यु.काँ. अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, डॉ.झामसिंग बघेले, डॉ.नामदेव किरसान, डॉ.योगेंद्र भगत, अमर वराडे, सभापती स्रेहा गौतम, शेषराव गिरीपुंजे, रत्नदीप दहीवले, राजेश नंगागवळी, जहीर अहमद, डेमेंद्र रहांगडाले, टीनू पटेल आदी मंचावर उपस्थित होते. गांधी चौकातील जाहीर सभेत नागरिकांना अभिवादन करताना अशोक चव्हाण व आ.गोपालदास अग्रवाल तसेच उपस्थित जनसमुदाय.
खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपपासून सावधान!
By admin | Published: January 06, 2017 12:42 AM